ठाण्यातील रस्त्यांची चाळण,पावसाळ्यापूर्वी केला कोट्यवधींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:32 AM2019-08-09T00:32:47+5:302019-08-09T00:33:00+5:30
बोटीतून प्रवास केल्याचा भास; वाहतूककोंडीने ठाणेकर त्रस्त, खड्डे पडणार नाही हा पालिकेचा दावा ठरला फोल,योग्य पद्धतीने कामे झाली नाहीत
ठाणे : पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्चून ठाणे शहरातील रस्ते चकाचक केले होते. मात्र, पावसाने महापालिकेच्या या कामाची पोलखोल केली असून शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची चाळण झाली असल्याचे विदारक चित्र संपूर्ण ठाणे शहरात दिसत आहे.
महामार्गही खड्ड्यांत गेल्याचे चित्र असून सेवारस्त्यांवरून तर वाहने चालविणेही कठीण झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी झाला असून त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूककोंडीचे चित्रही निर्माण झाले आहे. एकूणच यापुढे पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा पालिकेचा दावा पावसाने पुन्हा एकदा फोल ठरविला आहे. त्यातही शहरातील रस्त्यांची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याचा साक्षात्कारही आता सत्ताधाऱ्यांना झाला आहे. परंतु, असे असले तरी महापालिकेच्या आकडेवारीत शहरात अवघे २०३७ खड्डे असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांची संख्या जास्त असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जात आहे की, बोटीतून प्रवास सुरूआहे. असा काहीसा भास ठाणेकरांना होऊ लागला आहे.
मागील वर्षी ठाणेकरांना पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात रस्त्यावरील खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पालिकेवर टीकेची झोडही उठली होती. दिवसरात्र पालिका हे खड्डे बुजविण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले होते. परंतु, त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्तेही चकाचक करण्यात आले
होते.
भ्रष्टाचाराचा आरोप होऊ लागला
यंदा ठाणेकरांना वारंवार खड्ड्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सुमारे ९०० कोटींच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील अनेक रस्त्यांची कामे सुरूझाली असून काही रस्ते पूर्ण झाले आहेत. असे असतानाही यंदाच्या पावसाने पालिकेच्या या मेहनतीवर पाणीच फेरल्याचे आता म्हणावे लागणार आहे. नव्याने केलेल्या रस्त्यांसह मुख्य रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल, सेवारस्ते या सर्वच रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप आता होऊ लागला आहे.
आकडेवारी फसवी
ठाणे महापालिकेने प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत खड्ड्यांचा सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेनुसार शहरात आजघडीला २०३७ खड्डे पडले असून यामध्ये सर्वाधिक खड्डे हे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आहेत. या ठिकाणी ५३० खड्डे आहेत. तर त्याखालोखाल वागळे इस्टेट भागात २८६, दिव्यात २३० ठिकाणी खड्डे पडले आहेत. दरम्यान ४०६१ चौ.मी. क्षेत्रफळाचे हे खड्डे असून त्यातील १७६१ खड्डे म्हणजेच ३६२४ चौ.मी. क्षेत्रफळाचे खड्डे भरण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर, आजही २६८ खड्डे भरण्याचे शिल्लक असून त्याचे क्षेत्रफळ ३६४ चौ.मी. एवढे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
येथे आहेत खड्डे
शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी, विवियाना मॉल, घोडबंदर सर्व्हिस रोड, मुख्य उड्डाणपूल, वागळे, कळव्याचा काही भाग, अगदी सिमेंट रस्त्यांवरील मार्गही अडखळला आहे. या खड्ड्यांवर आता तात्पुरत्या स्वरूपात पेव्हरब्लॉकचा मुलामा चढविला जात आहे. परंतु, ते सुद्धा उखडून खड्ड्यांचा आकार मोठा होत आहे. सेवारस्ते तर अक्षरश: वाहून गेले आहेत. मलनि:सारणाची कामे ज्याज्या भागात झाली आहेत, त्या ठिकाणाचे रस्ते खचले असून मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी पडले आहेत. हायवेवर खड्डे पडल्याने या ठिकाणच्या वाहतुकीचा वेगही आता मंदावला आहे. ते बुजविण्यासाठी कधी कोल्ड मिक्स, कधी जेट पॅचर तर कधी आणखी काही वेगळा प्रयोग केला जात आहे. यासाठी प्रभाग समितीनिहाय प्रत्येकी २५ लाखांचा खर्च आधीच ठेवला आहे. परंतु, याव्यतिरिक्त खड्डे बुजवण्यासाठी सुमारे दोन कोटीहून अधिकची तरतूद केली आहे. म्हणजे एकीकडे ठाणेकरांचा प्रवास खड्डेमुक्त होईल, असा दावा प्रशासन करीत आहे .