वाहतूककोंडीवर घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:30 AM2017-07-22T03:30:28+5:302017-07-22T03:30:28+5:30
दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या ठाण्याच्या वाहतूकप्रश्नावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गुरुवारी जोरदार चर्चा झाली. शहराच्या विस्कळीत वाहतुकीसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या ठाण्याच्या वाहतूकप्रश्नावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गुरुवारी जोरदार चर्चा झाली. शहराच्या विस्कळीत वाहतुकीसाठी महापालिकादेखील जबाबदार असल्याचे नगरसेवकांनी सोदाहरण स्पष्ट केल्यानंतर या विषयावर पालकमंत्री, महापालिका आणि वाहतूक शाखेची संयुक्त बैठक लवकरच घेण्याचा निर्णय महासभेने घेतला.
वाहतूककोंडीबाबत महासभेत मांडलेल्या लक्षवेधीदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी महापालिकेच्या विविध विभागांमुळे वाहतूकव्यवस्था आणखी विस्कळीत होत असल्याचा आरोप केला. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना महापालिकेने वाहतूकव्यवस्थेचा मुद्दाही विचारात घेतला पाहिजे. कोणत्याही बांधकामास मंजुरी देताना तिथे पुरेशा पार्किंग व्यवस्थेची खातरजमा महापालिकेने करावी, अशी सूचना त्यांनी केली. आर मॉलची पार्किंग सर्व्हिस रोडवर केली जाते. घोडबंदर ते कोपरी किंवा मुंब्रा ते कळवा यासारख्या वर्दळीच्या रस्त्यांना पर्यायी रस्तेच नसल्याने वाहनांची गर्दी वाढते. बांधकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना वर्दळीच्या वेळी मज्जाव केल्यास वाहतूक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे मतही त्यांनी मांडले. रेतीबंदर भागात महापालिकेने चौपाटीऐवजी वर हँगिंग गार्डन आणि खाली ट्रक टर्मिनस उभारले, तर त्याचाही फायदा वाहतूकव्यवस्थेस होऊ शकतो. लालबहादूर शास्त्री रोडवर जागोजागी अनावश्यक यू टर्न दिले आहेत, त्यामुळेही वाहतूक विस्कळीत होते. तीन पेट्रोलपंप चौक आणि खोपट रोडवर महानगर गॅसपंपामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. मुंब्रा प्रभागात अतिक्रमण फोफावले असून ते हटवल्यास वाहतुकीस मदत होईल, असे शानू पठाण यांनी सुचवले. एका हृदयरोग्याला रेतीबंदर येथून खारेगाव येथील सफायर हॉस्पिटलमध्ये पोहोचवताना वाहतुकीमुळे झालेला विलंब सभागृहामध्ये मांडताना अनिता केणी यांनी ठाणेकर तुझा प्रशासनावर भरवसा नाय काय, हे विडंबनगीत म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. वाहतूककोंडी हा कोणत्या एका पक्षाचा प्रश्न नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी सेवा प्रतिष्ठान तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. याकामी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सुचवले.
‘लोकमत’च्या
बातमीवर चर्चा
लोकपुरम येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीअभावी वर्षभरापासून बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केले. नगरसेवक सुहास देसाई यांनी सभेत या बातमीचा उल्लेख केला. महत्त्वाच्या कामांमध्ये राजकारण करण्यात अर्थ नाही. अशा प्रकारच्या समस्यांसाठी वृत्तपत्र राजकारण्यांना जबाबदार धरतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
शिवसेनेला घरचा आहेर
वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. अशा अनेक गंभीर प्रश्नांवर महासभेमध्ये चर्चा केली जाते. परंतु, यातून काय साध्य होते, असा प्रश्न माजी महापौर अशोक वैती यांनी उपस्थित करून सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला.
सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्याला अशा प्रकारे खंत व्यक्त करावी लागते, हे दुर्दैव असल्याचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील म्हणाले. आगीत तेल ओतण्याची त्यांची चाल हेरून नरेश म्हस्के यांनी शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षानेही समर्थ साथ द्यावी, असा टोला लगावला.