भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा, २१ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी लूट
By नितीन पंडित | Published: February 20, 2024 06:14 PM2024-02-20T18:14:20+5:302024-02-20T18:15:28+5:30
जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंब सोबत राहतात.
भिवंडी: शहरातील ताडाळी या गावात राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा यांच्या घरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिरलेल्या तीन दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने,रोख रक्कम असा एकूण २१ लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत.या दरोड्याने परिसरात खळबळ माजली आहे.
जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंब सोबत राहतात. मध्यरात्री एक ते चार वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात शिरलेल्या २० ते ३५ वयोगटातील तिघा अज्ञात दरोडेखोरांनी साधना चौधरी झोपलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश करून त्यांच्या वर लोखंडी कटावणी उगारून मारण्याची धमकी देत बेडरूम मधील लाकडी कपाटाचे लॉकर मधील ५० तोळे वजनाचे विविध वर्णनाचे सोन्याचे दागिने व ९५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पोबारा केला आहे.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून साधना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिस ठाण्यात जबरी दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.