उल्हासनगरात खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णाची लूट; बिलाची ऑडिट करण्याची मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 02:48 PM2020-08-04T14:48:17+5:302020-08-04T14:48:27+5:30
आतापर्यंत १०८ बिलाची तपासणी ऑडिट समितीकडून होवून त्यामध्ये तफावत आढळल्यास नोटिसा देवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.
उल्हासनगर : शहरातील खाजगी कोविड रुग्णालयाकडून रुग्णाची लूट होत असून महापालिका ऑडिट कमिटी कागदावर असल्याची टीका मनसेने केली. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका कारभारात सुधारणा होत नसल्याने आंदोलनाचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी दिला आहे. तर आतापर्यंत १०८ बिलाची तपासणी ऑडिट समितीकडून होवून त्यामध्ये तफावत आढळल्यास नोटिसा देवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.
उल्हासनगरातील खाजगी कोविड रुग्णालय अव्वाच्या सव्वा बील आकारात असलेल्या विविध तक्रारीची माहिती स्थानिक नेंते व नगरसेवकांनी आयुक्तांना दिली. असे महापौर लीलाबाई अशान यांच्यासह अन्य नेत्याचे म्हणणे आहे. त्यानंतर खाजगी रुग्णालयात वाॅच ठेवण्यासाठी प्रभाग निहाय दक्षता समितीची स्थापना आयुक्तांनी केली. ठाणे - कल्याण महापालिका धर्तीवर आज पर्यंत किती बिलाचे ऑडिट करून रुग्णालयावर कारवाई केली. असे पत्र मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी महापालिका आयुक्तांना दिले. महापालिकेचे भरारी पथक कागदावर असून काहीएक कारवाई केली नसून यापूर्वी महापालिकेचा असा ढिसाळ कारभार पाहिला नसल्याची प्रतिक्रिया सचिन कदम यांनी दिली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कोविड खाजगी रुग्णालयात सुरू करणे, रुग्णालयाच्या बिलाचे ऑडिट करण्याकरिता नागरिकांना अधिकारी सहज उपलब्ध करून द्यावे, वाढीव बील देणाऱ्या रुग्णालयावर कडक कारवाई करावी, रुग्णालयाच्या दर्शनी भागात बेडची उपलब्धा व दरपत्रक लावावेत, रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण व औषध बाबत माहिती द्यावी व प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर डिस्प्ले क्रिन लावावी. ज्यामुळे आपल्या व्यक्तीला डिस्प्ले क्रीनवर पाहता येईल. आदी अनेक मागण्या मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी पत्राद्वारे केल्या आहेत. शहरातील जनतेच्या हितासाठी महापालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्हास धरणे आंदोलन करावे लागेल. असा इशाराही कदम यांनी दिला आहे.
१०८ बीलाचे ऑडिट, तफावत आढल्यास कारवाई
महापालिका दक्षता पथकाचा खाजगी रुग्णालयावर वाॅच असून आज पर्यंत १०८ बिलाचे ऑडिट सुरू आहे. त्यामध्ये तफावत आढळल्यास नोटिसा देवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांच्या मार्फत जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने यांनी दिली आहे.