गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लूट; काँग्रेसने विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:56+5:302021-08-20T04:46:56+5:30
ठाणे : एकीकडे केंद्र सरकार सिलिंडरच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ करीत असताना दुसरीकडे गॅस एजन्सीही ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून बुक केलेल्या ...
ठाणे : एकीकडे केंद्र सरकार सिलिंडरच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ करीत असताना दुसरीकडे गॅस एजन्सीही ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून बुक केलेल्या सिलिंडरचे पैसे भरल्यानंतरही डिलिव्हरीच्या वेळेस वाढीव पैसे मागून नागरिकांची लूट करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला.
एका ग्राहकाने १६ ऑगस्ट रोजी सिलिंडर ऑर्डर बुक करून ऑनलाइन पेमेंट केले. ८३४.५० रुपयांचे पेमेंट मिळाल्याचा अधिकृत मेसेज बीपीसीएलकडून त्यांना प्राप्त झाला. बुक केलेल्या सिलिंडरची १७ ऑगस्ट रोजी डिलिव्हरी करताना सिलिंडरचे भाव वाढलेले असल्याचे कारण देऊन जादा २५ रुपयांची आकारणी केली. पावती बघितली असता पावतीवर केलेल्या ऑनलाइन पेमेंटची नोंद ॲडव्हान्स पेमेंट, अशी केलेली होती. त्या रकमेखाली नेट २५, अशा रकमेची नोंद होती. दुसरीकडे, नियमाप्रमाणे सिलिंडर बुक करून त्याचे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने केलेले होते; परंतु त्यानंतर वाढलेली रक्कम बीपीसीएल अथवा त्यांची एजन्सी आकारू शकतच नाही. जर ती आकारायची असेल, तर तिचा समावेश मूळ किमतीत असला पाहिजे. जेणेकरून त्या रकमेवर सीजीएसटी व एसजीएसटीची आकारणी होईल; परंतु ही रक्कम मूळ किमतीत समावेश न करता ग्राहकांना भुर्दंड देऊन कोणाच्या खिशात जाते, असा सवाल करून त्यांनी एजन्सीला जाब विचारला. इंटक अध्यक्ष सचिन शिंदे, श्रीकांत गाडीलकर, सागर लबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.