हॉटेलवाल्यांकडून परदेशातून आलेल्या नागरीकांची लुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:24 PM2020-05-11T16:24:54+5:302020-05-11T16:26:29+5:30
मागील जवळ जवळ दिड महिना परदेशात अडकलेल्या नागरीकांची आता घरवापसी झाली आहे. परंतु त्यांना विविध ठिकाणच्या हॉटेलमध्ये ठेवले जात असून ठाण्यात दोन हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरीकांकडून हॉटेलवाल्यांनी लुट सुरु केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे : परदेशात अडकलेल्या नागरीकांना आता परतीचा प्रवास मोकळा झाला आहे. आता टप्याटप्याने या नागरीकांना भारतात आणले जात आहे. ठाणे, मिरारोड आदी भागातील नागरीकही मागील दोन दिवसापासून ठाण्यात आले आहेत. परंतु ठाण्यात ज्या दोन हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणचे पुढील १४ दिवसांचे भाडे अव्वाच्या सव्वा आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे नागरीक आणखीनच संपातले आहेत, त्यातही या ठिकाणी साफसफाई नाही, इतर काही सुविधा योग्यरितीने पुरविल्या जात नसल्याचा आरोपही या रहिवाशांनी केला आहे.
मागील जवळ जवळ दिड महिना परदेशात अडकलेल्या नागरीकांना आता मायदेशी आणले जात आहे. ठाण्यातही त्यानुसार परदेशातून आलेल्यांसाठी दोन हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १०० नागरीक ठाण्यात आल्याचे पालिकेचे म्हणने आहे. त्यानुसार या दोन हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. परंतु हॉटेलमध्ये येताच आधी पैसे भरा मगच रुम मिळेल असा तगादा लावला गेला. त्यानंतर पुढील १४ दिवसांचे एका रुमचे भाडे तब्बल ४५ ते ५५ हजार भरावे लागले आहे. मिरारोडमधील एका कुटुबांला मिरारोडला जायचे होते. परंतु त्यांनाही ठाण्यातील हॉटेलमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यात त्यांच्या समवेत एक ६३ वर्षीय वृध्द व्यक्ती असून त्यांना किडणीचा आजार आहे. त्यामुळे मिरारोडला सोडण्यात यावे, तेथील हॉटेलमध्ये आम्ही वास्तव्य करु अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र असे असतांनाही त्यांना आता याच हॉटेलमध्ये वास्तव्यास राहण्यास सांगण्यात आले आहे. परंतु आता त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्य फौजीया नाईक यांनी दिली. त्यात या हॉटेलमध्ये राहण्याची सोय आहे, मात्र स्वच्छता नाही, साफसफाई नाही, इतर सर्वच सुविधांचा बोजरावा उडाला आहे. त्यातही पिण्याचे पाणी हे विकत घ्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही पुन्हा भारतात येऊ न चुक केली का? असा सवाल त्यांना सवाल पडला आहे. अशीच परिस्थिती अन्य नागरीकांचीही झाली असून किमान योग्य प्रकारे साफसफाई तरी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान या दोनही हॉटेलकडून लुट सुरु असून त्यानुसार सुविधा देखील दिल्या जात नसल्याचे या नागरीकांचे म्हणने आहे. दोन रुमसाठीच पुढील १४ दिवसांसाठीचे १ ते सव्वा लाखांचे भाडे भरावे लागत असून एवढा पैसा आता आणायचा कुठुन असा सवाल त्यांनी केला आहे.