ट्रकचालकांकडून परप्रांतीय कामगारांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:54 AM2020-04-26T00:54:28+5:302020-04-26T00:54:31+5:30
या परिस्थितीचा फायदा घेत ट्रकचालक प्रत्येकाकडून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी ३ ते ४ हजार रुपये देत आहेत. एका ट्रकमध्ये ५० ते ६० जणांना कोंबत असल्याने फिजीकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.
भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन असल्याने भिवंडीतील यंत्रमाग आणि रोजंदारीवरील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत या कामगारांना गावाला जायचे आहे. या परिस्थितीचा फायदा घेत ट्रकचालक प्रत्येकाकडून उत्तर प्रदेशात जाण्यासाठी ३ ते ४ हजार रुपये देत आहेत. एका ट्रकमध्ये ५० ते ६० जणांना कोंबत असल्याने फिजीकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.
हाताला काम नसल्याने अनेक कामगारांनी रस्त्याने पायी चालत घरची वाट धरली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून आता या कामगारांना घरी जाण्यापासून रोखण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परप्रांतीय कामगारांना ट्रक चालकांनी घरी सोडण्याचे आमिष दाखवून कामगारांची लूट करण्यास सुरु वात केली आहे. पोलिसांकडून ट्रकचालकांवर गुन्हे दाखल होत असूनही हे चालक कामगारांना घेऊन जाण्यासाठी तयार होत आहेत.
विशेष म्हणजे ट्रकमध्ये बसण्याआधीच चालक कामगारांकडून ही रक्कम आधीच घेतात. एका ट्रकमध्ये ५० जण जरी पकडले तरी दीड ते दोन लाख रु पये ट्रक चालकमालक कमवत आहेत. मात्र, हे ट्रक नाकबंदीत पकडल्यानंतर ट्रकचालकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करतात. मात्र कामगारांना त्यांचे पैसे परत केले जात नाही. त्यामुळे हाती असलेली तुटपुंजी रक्कमही ट्रकचालक घेऊन पसार होत असल्याने कामगारांवर उपासमारीसह आर्थिक संकटही ओढावले आहे. कामगारांनी अशा परिस्थितीत गावी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.