नाशिक महापालिका आयुक्तांच्या ठाण्यातील घरावर चोरटयांचा डल्ला, दीड लाख लुटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 09:40 PM2022-03-13T21:40:12+5:302022-03-13T21:40:56+5:30
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांच्या ठाण्यातील वसंत विहार येथील घरातून चोरटयांनी एक लाख ६२ हजारांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी घडली.
जितेंद्र कालेकर
ठाणे: नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांच्या ठाण्यातील वसंत विहार येथील घरातून चोरटयांनी एक लाख ६२ हजारांची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी त्यांचा मुलगा चारुदत्त जाधव याने चितळसर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.
वडिल नाशिक येथे आयुक्त पदावर कार्यरत असल्याने त्यांना भेटण्यासाठी मुलगा चारुदत्त हा ११ मार्च २०२२ रोजी सायंकाळी गेला होता. त्याआधी आई ८ मार्च रोजी नाशिक येथे गेली होती. त्यामुळे घरात कोणीच नसल्याने चोरटयांनी या घराच्या बेडरुमच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आत शिरकाव केला. त्यानंतर घरातील लाकडी कपाटातील ड्रावरमधील एक लाख ६२ हजारांची रोकड लंपास केली.
११ मार्च रोजी दुपारी ४.३५ ते १२ मार्च रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. विशेष म्हणजे याच बंगल्याच्या बाजूला असलेल्या १५ - ब या बंगल्यात जाधव यांच्या घराचे केअर टेकरही होते. त्यांनाही चकवा देऊन चोरटयांनी चक्क आयुक्तांच्याच घरातील रोकड लंपास केली. याप्रकरणी आयुक्तांचा मुलगा चारुदत्त जाधव याने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.