खासगी रुग्णालयांकडून भिवंडीत रुग्णांची हाेतेय लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 11:20 PM2021-05-05T23:20:02+5:302021-05-05T23:20:41+5:30

सरकारी नियम धाब्यावर : बिल न भरल्यास पाेलीस तक्रारीची धमकी

Robbery of patients in Bhiwandi by private hospitals | खासगी रुग्णालयांकडून भिवंडीत रुग्णांची हाेतेय लूट

खासगी रुग्णालयांकडून भिवंडीत रुग्णांची हाेतेय लूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : राज्यातील काही रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे समोर आल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी रुग्णालयांना सरकारी नियमांप्रमाणे बिल आकारण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, भिवंडीत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांकडे खासगी डॉक्टर व रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहेत. नियमांना बगल देत भिवंडीतील खासगी रुग्णालये मानमानीपणे बिले आकारत असल्याचे उघड झाले आहे. खासगी रुग्णालयांकडून होत असलेल्या पिळवणुकीमुळे ऐन कोरोना संकटात रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जर बिल भरले नाही, तर रुग्णालयांकडून दमदाटी अथवा पोलिसात तक्रारी करण्याची धमकीही दिली जाते.

बुधवारी राहनाळ येथील खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. वडूनवघर गावातील बाळू पाटील यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयाने तीन दिवस आयसीयू व सात दिवस जनरल वॉर्डात असे नऊ दिवस रुग्णालयात उपचार केले. मात्र, या नऊ दिवसांसाठी रुग्णाच्या नातेवाइकाने तब्बल १ लाख ६७ हजार रुपयांचा बिल भरले. विशेष म्हणजे, रुग्णालयाने त्यांना आकारलेल्या बिलामध्ये आयसीयू चार्जेस एका दिवसाला नऊ हजार रुपये आकारला आहे, तर आयसीयूमध्ये ऑक्सिजन सुविधा पुरविली त्याचे पाच हजार एका दिवसाचे आकारले असून, आयसीयूमध्ये असलेल्या मॉनिटरचे १,५०० रुपये प्रतिदिन आकारले आहेत. असे १ लाख ६७ हजाराचे बिल रुग्णांच्या नातेवाइकांनी भरले. मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही मेडिकल बिल ३३ हजार या बिलव्यतिरिक्त आकारले. मेडिकल बिल भरण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांकडे पैसे नसल्याने रुग्णाला डिस्चार्ज देण्यास रुग्णालयाने नकार दिला व नातेवाइकांची तक्रार थेट नारपोली पोलिसांना केली. एक लाख ६७ हजार बिल भरूनही रुग्णालये आता दमदाटी व पोलिसांची भीती घालून रुग्णाकडून बिल वसूल करीत आहेत.

‘रुग्णाला न्याय मिळवून देऊ’
यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे विचारणा केली असता, या संदर्भात आपण माहिती घेऊन चौकशी करू व रुग्णाला न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Robbery of patients in Bhiwandi by private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे