भाईंदरमध्ये पे अॅण्ड पार्क ठेकेदाराकडून लूट; बेकायदा तिप्पट वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:08 AM2020-03-13T00:08:10+5:302020-03-13T00:08:22+5:30
१०६ वाहनक्षमता असताना ३०० वाहने करतो उभी
मीरा रोड/भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील स्कायवॉकखालील पे अॅण्ड पार्कमध्ये वाहने उभी करण्याकरिता पाच रुपयांऐवजी चक्क १५ रुपये वसूल करणाऱ्या तसेच प्रमाणापेक्षा जास्त संख्येने वाहने उभी करून महापालिकेला गंडा घालणाºया ठेकेदाराविरुद्ध सातत्याने तक्रारी होऊनही संबंधित विभागातील अधिकारी ठेकेदारास पाठीशी घालत असल्याने त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी आहे.
भाईंदर पश्चिमेस रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या स्कायवॉकच्या खाली महापालिकेने चक्क गटारावर व रस्त्याच्या भागात दुचाकी वाहनतळासाठी ए-वन केअरटेकर प्रा.लि. या ठेकेदारास तीन वर्षांकरिता २०१६ मध्ये पे अॅण्ड पार्कचा ठेका दिला होता. अंदाजे १०६ दुचाकी क्षमता अपेक्षित धरून पालिकेने १२ लाख ९० हजार रुपयांना ठेका दिला. दुचाकीचे शुल्क सहा तासांकरिता ५ रु., १२ तासांकरिता ८ रु. व २४ तासांकरिता १२ रुपये, असे करारनाम्यानुसार निश्चित केले होते. १४ जून २०१९ रोजी मुदत संपुष्टात आल्यावर व मुदतवाढ दिल्यावर हेच दर कायम ठेवणे अपेक्षित होते. मात्र, ठेकेदाराने दरफलक न लावताच नागरिकांकडून पाच रुपयांऐवजी १५ रुपये पार्किंग शुल्कवसुली केली आहे. नागरिकांना दिल्या जाणाºया पावत्यांवर वेळ टाकून देत नाहीत. पालिकेने १०६ दुचाकींचा अंदाज धरून ठेका दिला असताना ठेकेदार प्रत्यक्षात त्याच जागेत ३०० ते ४०० दुचाकी उभ्या करून वारेमाप फायदा कमावतो आहे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. तिप्पट वसुली व वाहने यातून अतिरिक्त लाभ कमावणारा ठेकेदार महापालिकेचा महसूल बुडवत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत कृष्णा गुप्ता, प्रवीण परमार यांनी पालिकेस तक्रारी करूनही तत्कालीन उपायुक्त व विभागप्रमुख यांनी त्याची दखल घेतली नाही. नगरसेवक पंकज पांडेय यांनीही पालिकेस तक्रारी करून ठेके दाराने दरफलक लावला नसल्याकडे लक्ष वेधले होते. ठेकेदारास काळ्या यादीत टाका, त्याची अनामत रक्कम जप्त करा व ठेका रद्द करा तसेच ठेकेदाराला संरक्षण देणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा मागण्या तक्रारदारांनी केल्या आहेत.