पेट्रोल ग्राहकांची लूट पालघरला उघडकीस
By admin | Published: September 5, 2015 02:54 AM2015-09-05T02:54:29+5:302015-09-05T02:54:29+5:30
पालघरच्या गणेशकुंडाजवळील भारत पेट्रोलियमच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपावर रिडींगवर दाखविलेल्या लिटरपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याची फसवेगिरी लोकमतने उघडकीस आणली
पालघर : पालघरच्या गणेशकुंडाजवळील भारत पेट्रोलियमच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपावर रिडींगवर दाखविलेल्या लिटरपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याची फसवेगिरी लोकमतने उघडकीस आणली असून पुरवठा अधिकाऱ्यांनी हा पेट्रोलपंप तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पालघरच्या सी.टी. पारीख पेट्रोलपंपामधून ग्राहकांनी मोजलेल्या दामापेक्षा कमी व रॉकेलमिश्रित पेट्रोल दिले जात असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी लोकमतचे वार्ताहर आरीफ पटेल यांनी दोन मोटारसायकली पेट्रोल भरण्यासाठी पाठवल्या. त्याप्रमाणे देवराम वायडा, रा. करळगाव (मनोर) व पिंटू वर्मा, रा. मस्तान नाका यांनी आपल्या मोटारसायकलींमध्ये पेट्रोल टाकून त्याच्या पावत्याही घेतल्या. त्यानंतर, पेट्रोलपंप कार्यालयातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दोन्ही गाडीतील पेट्रोल नळीद्वारे बाहेर काढून मोजले असता अवघे चार लीटर निघाले. या फसवाफसवीचे वृत्त जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हापुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांच्या कानी घातल्यानंतर तपासाची चक्रे हलली. तालुका पुरवठा अधिकारी संभाजी पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता प्रथमदर्शनी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांपेक्षा कमी पेट्रोल दिले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. याच वेळी वैध मापन परिमाण विभागाकडून प्रमाणित करून दिलेल्या पेट्रोल भरण्याच्या मापन यंत्रात फेरफार करून कमी पेट्रोल देण्याचे सेटिंग करून ठेवल्याचे दिसून आले. याबाबत तालुका वैध मापन परिमाण निरीक्षक महेंद्र सुखसे यांना माहिती दिली असता कळविले. ते उशिरा आले आणि पेट्रोल वितरण व्यवस्थेत दोष नसल्याचे सांगून त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.