वाढदिवसाच्या पार्टीसाठी ठाण्यात दरोडा; सहा जणांच्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 11:56 PM2019-09-13T23:56:25+5:302019-09-13T23:56:39+5:30
३६ तासांत गुन्हा उघड, पिस्तूल, काडतुसे आणि वाहन जप्त
ठाणे : वाढदिवसाच्या पार्टीसाठी साथीदारांच्या मदतीने बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाला लुटणाऱ्या अभिमन्यू पाटील या म्होरक्यासह त्याच्या पाच साथीदारांना ठाणे पोलिसांनी अटक करून पिस्तूल, काडतुसे तसेच वाहन आणि रोख रक्कम असा पाच लाख १५ हजार १०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. हा गुन्हा अवघ्या ३६ तासांमध्ये उघडकीस आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे ब्रह्मांड येथील रहिवासी असलेले थॉमस कुट्टी यांचा हॉस्पिटल्सना परिचारिका व वॉर्डबॉय पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे कार्यालय विक्रोळीत असून ३ सप्टेंबरला रात्री ११ च्या सुमारास ते कारचालक भाऊसाहेब खिल्लारे यांच्यासह घरी जात होते. याचदरम्यान कापूरबावडी येथे वंडरमॉलनजीक एका कारमधून आलेल्या टोळीने त्यांच्या कारसमोर गाडी आडवी घालून बंदुकीचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली व दोन लाख असलेली पिशवी हिसकावून पलायन केले. याप्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.सी. केदार यांनी या प्रकरणाचा तपास करीत असताना कुट्टी यांचा पूर्वाश्रमीचा चालक अभिमन्यू पाटील (२३, रा. आझादनगर), तौफिक शेख (२१, रा. भीमनगर-वर्तकनगर), गणेश इंदुलकर (२२, रा. वर्तकनगर), उत्कर्ष धुमाळ ऊर्फ लाडू (२१, रा. आनंदनगर, कोपरी), गुरु नाथ चव्हाण (२२, रा. धर्माचापाडा), राहुल गुहेर ऊर्फभाल (२२, रा. चिरागनगर) यांच्या मुसक्या आवळल्या. तर, त्यांचे साथीदार चेतन कांबळे व रोशन तेलंगे हे आरोपी फरार आहेत. कुट्टी यांचा हॉस्पिटल्सना नर्सेस आणि वॉर्डबॉय पुरवण्याचा व्यवसाय असून पगारातल्या कमिशनची १२ टक्के रक्कम महिन्याच्या १, २ आणि ३ तारखेला ही रक्कम त्यांच्याकडे येते, हे अभिमन्यूला माहीत होते.
नंबरप्लेट बदलून मित्राच्या गाडीचा वापर : २४ सप्टेंबरला अभिमन्यूचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी झटपट पैसे मिळवण्यासाठी या टोळीने हा दरोड्याचा कट रचला होता. पाटील आणि गणेश इंदुलकर हे पहिल्यापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. अभिमन्यू याच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये ३०७ चा गुन्हा दाखल आहे, तर गणेश इंदुलकर याच्यावर मुलुंड येथे ३९५ चा गुन्हा दाखल आहे. या दरोड्यासाठी त्यांनी भिवंडी येथील मित्राची गाडी घेऊन तिची नंबरप्लेट काढल्याचेही पोलिसांनी सांगितले.