रोबोटिक ब्लेड फ्री लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:10 AM2018-02-08T03:10:25+5:302018-02-08T03:10:48+5:30
ठाण्यातील एका नेत्रालयात राज्यातील पहिली रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
ठाणे : ठाण्यातील एका नेत्रालयात राज्यातील पहिली रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अवघ्या २० सेकंदांत कोणतेही ब्लेड किंवा हत्यार न वापरता लेझरच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली जात असून तीन ते चार दिवसांत रुग्ण नेहमीप्रमाणे कामावर रुजू होऊ शकतो. या अत्याधुनिक मशीनची किंमत चार करोड रुपये असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने बुधवारी ठाण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
डोळे अनमोल असून साधारणत: पन्नाशीनंतर डोळ्यांमध्ये मोतीबिंदूची लक्षणे दिसू लागतात. त्यातच, अस्पष्ट दिसण्यास सुरुवात होते. मोतीबिंदूमध्ये डोळ्यांच्या बुब्बुळावर एक पडदा तयार होतो. बुब्बुळाच्या आतमध्ये मोतीबिंदू पिकू लागतो. सध्या तरी डोळ्यांचे डॉक्टर मोतीबिंदू दोष घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. मात्र, शस्त्रक्रिया हाताने केली जाते. त्यातच दिल्ली, चेन्नईपाठोपाठात आता ठाण्यात रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. संगणकाच्या साहाय्याने डोळ्यांचे स्कॅनिंग करून लेझरचा वापर करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे रुग्णाला २० सेकंदात मोकळे केले जाते. तर, मानवी मेंदू व हात वापरून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायला साधारण १० मिनिटे लागतात. मात्र, यावेळी कितीही काळजी घेतली तरी छोटीशी मानवी चूक माणसाला फार मोठी किंमत मोजायला लावू शकते. मात्र, नवीन रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने अचूकता १०० टक्के येते. तसेच प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत कोणताही धोकादेखील नसतो, असा दावा या नेत्रालयाने केला आहे.
ही मशीन अमेरिकेतील लेन्सार कंपनीची असून राज्यात या नेत्रालयात पहिल्यांदाच आणण्यात आली आहे. मागील तीन आठवड्यांत २५ जणांवर मशीनद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया क रण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया करताना संगणक पेशंटच्या डोळ्यांची मोजणी करून स्कॅनिंग करतो आणि एक प्रकारची थ्रीडी इमेज करून त्याचे संकल्पचित्र डॉक्टरला दाखवतो. डॉक्टरांनी ओके म्हटले की कोणतेही ब्लेड किंवा हत्यार न वापरता लेझरच्या साहाय्याने नेत्रपटलावरील जमा झालेला पडदा काढला जातो. मोतीबिंदूने त्रस्त रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया एकदा केली की, पुन्हा मोतीबिंदूचा त्रास उद्भवत नाही. ज्यांच्या बुब्बुळात जन्मत: दोष असतो, तोदेखील या शस्त्रक्रियेद्वारे घालवता येतो.