कोपर खाडीच्या पाण्यापासून रुळांस धोका
By Admin | Published: August 10, 2015 11:07 PM2015-08-10T23:07:33+5:302015-08-10T23:07:33+5:30
वाळू माफियांनी बेकायदेशीर रेती उत्खननकरतांना खाडीकिनारेदेखील पोखरल्याने कल्याण तालुक्यातील कोपर खाडीचे पाणी येथून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या रुळांस लागण्याची शक्यता
ठाणे: वाळू माफियांनी बेकायदेशीर रेती उत्खननकरतांना खाडीकिनारेदेखील पोखरल्याने कल्याण तालुक्यातील कोपर खाडीचे पाणी येथून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या रुळांस लागण्याची शक्यता असल्यामुळे लोहमार्ग खचून रेल्वे गाड्या घसरण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांआधी रेल्वे रुळांपासून या कोपर खाडीचे पात्र खूप लांब होते. या दरम्यानच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात खारफुटीचे जंगल होते. त्यामुळे रेल्वे मार्गाकडे येणारे खाडीचे पाणी खारफुटीमुळे अडविले जात होते. पण, ती खारफुटी नष्ट करून तेथील रेतीचे ड्रेझरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले. यामुळे या परिसरात भरतीचे पाणी पसरून ते रेल्वे रुळांस लागण्याची शक्यता आहे.
यामुळे रेल्वे रुळांखालील मातीच्या भरावाची झीज होऊन लोहमार्ग कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यातून कोणत्याही क्षणी रेल्वे वाहतुकीस धोका संभवू शकतो. याकडे ठाणे जिल्हा प्रशासनासह तालुकास्तरीय महसूल विभाग आणि रेल्वे प्रशासनही दुर्लक्ष करीत आहेत.
या खाडी परिसरात होत असलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर रेती उत्खननास आळा घालण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडून वेळोवेळी धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. पण, त्यांना मात्र कधीही आरोपी सापडले नाही.
कारवाई केल्याचा गवगवा करून निनावी गुन्हे दाखल करण्याचे काम मात्र या विभागाने आतापर्यंत केलेले आहे. यामुळेच येथे उत्खनन करणाऱ्यांची हिम्मत वाढून कोपर खाडीकिनारा त्यांनी पूर्णपणे पोखरला आहे. पण, त्यांना रेतीमाफिये अद्याप सापडले नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे याला आळा घातला गेला नाही तर मोठा अपघात होऊन मध्य रेल्वे प्रदीर्घ काळ ठप्प होण्याची व मोठी मनुष्यहानी घडण्याची देखील शक्यता आहे. (प्रतिनिधी)