रोहा गाडी उशिरा आल्याने दिव्यात ‘रेल रोको’
By admin | Published: January 12, 2017 06:48 AM2017-01-12T06:48:47+5:302017-01-12T06:48:47+5:30
दिवा-रोहा मार्गावरील रेल्वेगाडी गेल्या सहा महिन्यांपासून अनियमित असल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांनी बुधवारी दिवा
डोंबिवली : दिवा-रोहा मार्गावरील रेल्वेगाडी गेल्या सहा महिन्यांपासून अनियमित असल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांनी बुधवारी दिवा रेल्वे स्थानकात ‘रेल रोको’ केला. बुधवारी रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
८ वाजताच्या सुमारास येणारी गाडी आज ८ वाजून ४० मिनिटांनी आली. या लेटलतिफी कारभाराविरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त करीत उत्स्फूर्तपणे रेल रोको केला. या घटनेची रेल्वे प्रशासन व पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. नेमका कशामुळे गोंधळ उडाला, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. रेल रोकोमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्या प्रवाशांना या गोंधळाचा फटका बसला. ठाणे रेल्वे स्थानकातही गाड्या खोळंबून होत्या. यामुळे दोन क्रमांकाच्या फलाटावर प्रवाशांची खच्चून गर्दी झाली होती. ठाणे लोकलने ठाणे स्थानक गाठून त्यापुढील प्रवास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांतून करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाशी-पनवेल येथे कामानिमित्त जाणाऱ्या डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूरच्या हजारो प्रवाशांना या गोंधळामुळे ठाणे स्थानकावर अडकून पडावे लागले. रेल रोकोमुळे मध्य रेल्वे प्रशासनाची चांगली भंबेरी उडाली. (प्रतिनिधी)