उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कलानी कुटुंबाची भूमिका महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:52 AM2019-03-19T04:52:30+5:302019-03-19T04:53:44+5:30

कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एका विशिष्ट पक्षाचे वर्चस्व नसले, तरी कलानी कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे.

The role of the Kalani family in Ulhasnagar assembly constituency is important | उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कलानी कुटुंबाची भूमिका महत्त्वाची

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कलानी कुटुंबाची भूमिका महत्त्वाची

googlenewsNext

- सदानंद नाईक

उल्हासनगर - कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एका विशिष्ट पक्षाचे वर्चस्व नसले, तरी कलानी कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे. मतदारसंघात बहुसंख्य सिंधी मतदार असून मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम, अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. २०१४ मध्ये मोदीलाट असतानाही राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांना ४३ हजार २५७, तर भाजपाचे कुमार आयलानी यांना ३७ हजार ७१९ मतदान झाले होते.
उल्हासनगर शहर तीन मतदारसंघांत विभागले आहे. शहर पश्चिम, म्हारळ, कांबा व वरपगाव मिळून उल्हासनगर मतदारसंघ तयार झाला. उल्हासनगर पूर्व हा अंबरनाथ व कल्याण पूर्व मतदारसंघात विभागला गेला आहे. उल्हासनगर मतदारसंघावर सुरुवातीला जनसंघाचा प्रभाव होता. भाजपाचे शीतलदास हरचंदानी येथून सलग तीन वेळा निवडून आले. त्यानंतर, सलग चार वेळा पप्पू कलानी विविध पक्षांच्या तिकिटांवर विजयी झाले. २००९ मध्ये भाजपाच्या कुमार आयलानी यांनी पप्पू कलानी यांचा सहा हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. त्यावेळी शहरातून कलानीराज संपल्याची चर्चा होती. दरम्यान, पप्पू कलानी यांना एका हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांची रवानगी जेलमध्ये झाली. अशा परिस्थितीतही २०१४ मध्ये देशभरात मोदीलाट असतानाही, ज्योती कलानी यांनी कुमार आयलानी यांना धूळ चारून पराभवाची परतफेड केली. त्यावेळी शिवसेनेचे धनंजय बोडारे यांना तिसऱ्या क्रमांकाची २३ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या कल्याण लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती असल्याने, शिवसेनेचे नवखे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यापेक्षा जास्त मतदान येथून झाले. मतदारसंघातील म्हारळ, कांबा व वरपगावातून शिवसेनेला भरभरून मतदान झाल्याचा तो परिणाम होता. उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी निवडून आल्या असल्या, तरी त्यांच्याकडे पूर्वीसारखी ताकद राहिली नाही.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत ओमी टीमने भाजपासोबत आघाडी करून महापालिकेत सत्ता स्थापन केली. त्यामुळे आमदार व महापौरपद एकाच घरात आले. त्यामुळे कलानी कुटुंबाची भूमिका या निवडणुकीत निश्चितच महत्त्वाची राहणार आहे.
महापालिकेत भाजपा-ओमी टीमचे ३२, स्थानिक साई पक्षाचे ११, राष्ट्रवादीचे ४, शिवसेनेचे २५, रिपाइं ४, काँग्रेस, पीआरपी, भारिपचे प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाने ओमी टीमसह साई पक्षासोबत आघाडी करून महापालिकेची सत्ता मिळवली असून शिवसेना विरोधी बाकावर आहे. उल्हासनगर मतदारसंघात भाजपा-ओमी टीमचे २७, शिवसेनेचे ११, रिपाइं २ असे नगरसेवक निवडून आले. ज्योती कलानी आमदार असूनही राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तीच परिस्थिती काँग्रेसची आहे. भाजपा-ओमी टीममधील अर्धेअधिक कलानी समर्थक आहेत.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर भाजपातील एक गट नाराज आहे. शहरात शिवसेनेसोबत असलेला रिपाइं आणि पीआरपी गटही नाराज आहे. तीच अवस्था साई पक्षाची आहे. म्हारळ, कांबा व वरप गावांत पूर्वीसारखे शिवसेनेचे वर्चस्व राहिले नाही. आघाडीने बाबाजी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून या परिस्थितीचा फायदा घेणे आघाडीला जमेल अथवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
श्रीकांत शिंदे निवडून आल्यानंतर त्यांनी कामगार विमा रुग्णालयाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षांत त्यांनी रुग्णालयाच्या इमारतीचे फक्त भूमिपूजन केले. इमारत कधी उभी राहणार, हा प्रश्नच आहे.
उल्हासनगर रेल्वेस्टेशनची दुरवस्था जैसे थे आहे. स्टेशनशेजारीच उघड्यावर मासेविक्री होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एक शौचालय, सरकते जिने, पादचारी पूल, दोन्ही बाजूंना एका रुपयात दवाखाना आदी सुविधा खासदारांनी दिल्या आहेत.

राजकीय घडामोडी

आघाडीचे बाबाजी पाटील उल्हासनगरात नवखे असून त्यांचा आतापर्यंत शहराशी तेवढा संपर्क आला नाही.
शिवसेनेच्या विरोधातील नाराज पक्ष, स्थानिक नेते आदींची मोट आघाडीला बांधावी लागणार आहे. रिपाइं, पीआरपी, काँगे्रस पक्षही आघाडी समर्थक आहेत.


दृष्टिक्षेपात राजकारण

मतदारसंघात सिंधी समाजाचे मतदार जास्त असून त्याखालोखाल मराठी, उत्तर भारतीय मतदार आहेत. सिंधीबहुल भागातील मतदार कलानीसमर्थक, तर काही भागात कट्टर भाजपासमर्थक आहेत. मात्र, मराठी-सिंधी वादामुळे शिवसेनेला त्यांची तेवढी पसंती मिळत नाही. मराठीबहुल परिसरात शिवसेना व रिपाइंची शक्ती आहे. उत्तर भारतीय मतदार आघाडीसमर्थक आहेत. सद्य:स्थितीत शहरात युतीपेक्षा आघाडीची बांधणी चांगली आहे.
या मतदारसंघात दोन लाख २१ हजार ७६२ मतदार असून २००९ च्या तुलनेत ५० हजारांपेक्षा जास्त मतदार कमी झाले. २०१४ मध्ये महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आली. त्यावेळी शिवसेना-भाजपाचे कुमार आयलानी हे आमदार होते. आघाडीचे आनंद परांजपे यांना २५ हजार ३६२, तर शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांना ६८ हजार मतदान झाले होते.
२७९ कोटींच्या भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने सुरू असून न्यायालयाने त्यावर ताशेरेही ओढले आहे. ३७ कोटींची खेमानी नाला योजना, रुंदीकरणानंतरही गेल्या तीन वर्षांपासून पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेला कल्याण-अंबरनाथ रस्ता, एमआयडीसीच्या १०० कोटींच्या निधीतून सुरू असलेले विविध रस्त्यांचे कामही रखडतरखडतच सुरू आहे. पाणीटंचाई, डम्पिंगचा प्रश्न, साफसफाई, तुंबलेले नाले, महापालिका विभागात सावळागोंधळ आदींमुळे शहर भकास झाले आहे.

Web Title: The role of the Kalani family in Ulhasnagar assembly constituency is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.