कामाचा ताण नसल्याची मोहन ग्रुपची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 02:37 AM2016-01-21T02:37:08+5:302016-01-21T02:37:08+5:30
अमर भाटिया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी ख-या अर्थाने सुरुवात झाली असून रेल्वे पोलिसांनी मोहन ग्रूपचे सर्वेसर्वा जितेंद्र मोहनदास यांची चौकशी केली.
पंकज पाटील , अंबरनाथ
अमर भाटिया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी ख-या अर्थाने सुरुवात झाली असून रेल्वे पोलिसांनी मोहन ग्रूपचे सर्वेसर्वा जितेंद्र मोहनदास यांची चौकशी केली. मोहन ग्रुपच्या कामाचा आणि आर्थिक व्यवहाराचा कोणताही ताण अमर यांच्यावर नसल्याची भूमिका या चौकशीवेळी जितेंद्र यांनी मांडली. त्यामुळे पोलिसांना व्यावसायिक कारणांसोबत इतर कारणेही तपासावी लागणार आहेत.
अमर भाटिया यांनी मामा हरीश भाटिया यांना एसएमएस करुन आत्महत्या करीत असल्याचे कळवले होते. पण त्यांनी आत्महत्या करण्याइतपत काय घडले, हे कोडे त्यांच्या निकटवर्तीयांना सुटलेले नाही. आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांची यंत्रणाही कामाला लागली आहे. ठाण्याच्या परमार प्रकरणाप्रमाणे हे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त झाल्याने मोहन ग्रुप या संदर्भात काय खुलासा करेल, याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
अखेर पोलीसांनी चौकशीसाठी बुधवारी जितेंद्र यांना बोलावले असता त्यांनी मोहन ग्रुपच्या सर्व आर्थिक व्यवहारांची आणि कामाची माहिती पोलिसांपुढे ठेवली. मोहन ग्रुपचे १२ मोठे प्रकल्प बदलापूरात सुरु असुन सहा हजार घरे बांधली जात आहेत. या प्रकल्पातील प्रत्येक कामाची जबाबदारीही वाटून देण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामाची परवानगी घेणे असो की जागेचा व्यवहार करणे असो या सर्वांसाठी मोहन ग्रुपची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे अमर यांना त्या कामाचा कोणताच ताण नव्हता. सुरु असलेल्या इमारतीच्या कामावर केवळ देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर होती, असे पोलिसांकडे स्पष्ट करण्यात आले.
आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र यंत्रणा होती. मोठ्या प्रमाणात प्रकल्पाची कामे सुरू असल्याने आर्थिक चणचणीचा कोणताच प्रश्न मोहन ग्रुपपुढे नव्हता. मोहन ग्रुपचे ते संचालक असल्याने त्यांच्या एकट्यावर कोणतेच मोठी जबाबदारी नव्हती. कंपनीचे काम पाहण्यासाठी १६ संचालकांची टीम काम करीत आहे. आमच्या कोणत्याही प्रकल्पाला आतापर्यंत कोणतीही अडचण शासनामार्फत किंवा स्थानिक शासकीय यंत्रणेमार्फत झालेली नाही. सर्व प्रकल्प नियमानुसार असल्याने कोणत्याही तक्रारीला वाव नव्हता. त्यामुळे अमर यांनी आत्महत्या का केली हे कोडे आम्हालाही सुटलेले नाही, असे म्हणणे जितेंद्र यांनी पोलिसांपुढे मांडले.
अमर भाटिया यांचे मामा हरी भाटिया हे देखील मोहन ग्रुपमध्ये संचालक असून त्यांनीही कंपनीत कोणताही तणाव नव्हता, याला दुजोरा दिला. असा तणाव निर्माण होण्यास वाव नव्हता, असे म्हणणे त्यांनी पोलीसांसमोर मांडले. सर्व सुरळीत असतांना हा प्रकार घडल्याने आम्हालाही धक्का बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.