भूमिका - केवळ तसबीर काढून पक्षाची प्रतिमा सुधारेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:19 AM2020-03-09T00:19:00+5:302020-03-09T00:19:55+5:30
मेहतांनी पक्ष व राजकारण सोडल्याचे जाहीर केले असले, तरी भाजपने मात्र अजूनही मेहतांना पक्षातून काढलेले नाही
धीरज परब, मीरा-भाईंदर
मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयातील दालनांमध्ये लावलेल्या माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या तसबिरी काढल्या असल्या तरी भाजपच्या जाहिरात फलकांसह कार्यक्रमांवर मात्र मेहता हेच आमचे आदर्श असल्याचे स्पष्ट केले जात आहे. भाजप नगरसेविकेच्या फिर्यादीवरूनच मेहतांवर बलात्कार व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला. सातत्याने असे प्रकार घडत असूनही भाजपने केवळ पालिका मुख्यालयातील मेहतांच्या तसबिरी बदलल्या असल्या तरी शहर व समाजातील मेहतांसोबतच भाजपची डागाळलेली प्रतिमा कितीही प्रयत्न केले तरी ती स्वच्छ करता येणार नाही.
एवढे होऊनही भाजपने मेहतांना पक्षातून काढलेले नाही. सोशल मीडिया व कार्यक्रमांवरही मेहताच भाजपचे नेते म्हणून कायम आहेत. यातूनच मेहतांचे भाजपमधील वरिष्ठांशी असलेले हितसंबंध पुन्हा अधोरेखित होतात. यामुळे भाजपची डागाळलेली प्रतिमा धुतली जाणार नाहीच, शिवाय नैतिकतेचा पक्ष असा टेंभा मिरवणारा भाजपचा बुरखा मेहतांमुळे फाटून खरा चेहरा समोर आला आहे.
अनधिकृत बांधकामप्रकरणी लाच घेताना पकडलेल्या मेहतांची राजकीय कारकीर्द वादानेच सुरू झाली. त्या आधी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील वाद चर्चेत नव्हते. लाच घेताना पकडले गेल्यानंतर मात्र मेहतांनी प्रचंड आर्थिक साम्राज्य उभे केले. शिवाय सभापती, महापौर, भाजपचे जिल्हाध्यक्ष, विरोधी पक्षनेता, आमदार आणि शहर व भाजपचे स्थानिक सर्वेसर्वा अशी राजकीय प्रगतीची घोडदौड थक्कच करणारी आहे. लाच घेताना पकडल्यानंतर उलट आर्थिक व राजकीयप्रगतीचा राजमार्ग कसा खुला होतो हेच मेहतांनी दाखवून दिले.
मेहतांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांचा वरदहस्त मिळवला. त्यातूनच त्यांनी शहरात महापालिका, पोलीस, महसूल, वन आदी सर्वच विभागांवर तसेच शहरातील विरोधकांवर आपला धाक निर्माण केला. मेहतांच्या मुजोर कारभारामुळे तळागाळातील सामान्य नागरिकांपासून वरपर्यंत मेहतांविरोधात रोष होता. तो २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मेहतांविरोधात उफाळून आला. सत्ता, संपत्ती व नगरसेवक-कार्यकर्त्यांची फौज असूनही नागरिकांनी पराभवाची धूळ चारून दणका देत घरी बसवले.
मेहतांचा पराभव, फडणवीस यांना पायउतार व्हावे लागल्याने गॉडफादरच विरोधी बाकावर बसल्याने तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. यातून मेहतांच्या अडचणीत वाढ होत आहे. बेकायदा बांधकामे, पर्यावरणाचा ºहास, अशा अनेक गंभीर प्रकरणासंदर्भात गुन्हे दाखल झाले असून कारवाईची वेळ आली आहे.
पालिका, शहर, पक्षावर एकहाती सत्ता असलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा व पर्यायाने पक्षाचा चेहरा समोर आला आहे. गंभीर प्रकरण घडूनही भाजपने त्यांना पक्षातून काढण्याची हिम्मत दाखवलेली नाही, यातूनच खूप काही सांगितले जात आहे.
भाजपकडूनच मेहतांचे उदात्तीकरण : मेहतांनी पक्ष व राजकारण सोडल्याचे जाहीर केले असले, तरी भाजपने मात्र अजूनही मेहतांना पक्षातून काढलेले नाही. मेहतांसाठी सतत शहरात येणारे व त्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीसही गप्प आहेत. उलट भाजपचे रवींद्र चव्हाण मेहतांच्या बंगल्यावर व सीएन रॉक हॉटेलवर आपली हजेरी लावत आहेत. भाजप व मेहता दोघेही एकमेकांना सोडण्यास तयार नसून, यातूनच मेहतांचे समर्थन व उदात्तीकरण भाजपकडून केले जात आहे.