ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १०३ सायलेन्सरवर फिरविला रोलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:57+5:302021-07-01T04:26:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : डोंबिवली शहर व कोळसेवाडी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १०३ दुचाकींचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली शहर व कोळसेवाडी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १०३ दुचाकींचे माॅडिफाईड सायलेन्सर जप्त केले होते. या सायलेन्सरचा पुनर्वापर होऊ नये, यासाठी बुधवारी त्यावर ठाकुर्लीतील म्हासोबा चौकात रोलर फिरविण्यात आला. तसेच संबंधित दुचाकी चालकाविरोधात ई-चालानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, यापुढेही अशा प्रकारची मोहीम सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील हे देखील या कारवाईच्या वेळी उपस्थित होते. डोंबिवली शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गीत्ते म्हणाले की,‘दुचाकीस्वारांनी आपल्या दुचाकीला कंपनीने लावलेले सायलेन्सर बदलू नये. काही कारणांनी बदल केला असल्यास ते पूर्वीप्रमाणे कंपनी फिटेड सायलेन्सर असावेत. जर कुणी कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसविल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच संबंधिताचा वाहन परवानाही रद्द करण्यात येईल.’
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पाटील यांच्या आदेशानुसार, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीचे पोलीस निरीक्षक उमेश गीत्ते, सहायक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे तसेच कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिरसाट, पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ चौधरी, आदींनी कारवाई केली.
--------
फोटो आहे