अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या
By संदीप प्रधान | Updated: December 16, 2024 09:35 IST2024-12-16T09:35:02+5:302024-12-16T09:35:34+5:30
ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे.

अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या
संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक
ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे. या विरोधातील कारवाई ही थातुरमातुर अशीच आहे. अनधिकृत बांधकाम करणारे माफिया, सत्ताधारी नेते आणि महापालिकेचे अधिकारी यांचे हितसंबंध जोपर्यंत घट्ट आहेत, घरांची गरज असलेल्यांची संख्या जास्त आणि उपलब्ध परवडणारी स्वस्त घरे कमी असे व्यस्त प्रमाण जोपर्यंत आहे तोपर्यंत अनधिकृत बांधकामांची शृखंला पूर्णपणे तोडणे अशक्य आहे. न्यायालयाने फटकारले की, महापालिका तात्पुरती कारवाई करते. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या न्यायाने अनधिकृत बांधकामांचे इमले चढतच जातात.
निवारा ही मूलभूत गरज आहे. हजारो लोक रस्त्यावर वास्तव्य करतात. ज्यांना रस्त्यावर राहणे शक्य नाही ते अनधिकृत बांधकामात आसरा घेतात. एकेकाळी अर्बन लँड सिलिंग ॲक्टच्या भीतीने जमीन मालकांनी आपल्या जमिनींवर बेकायदा चाळी, इमारती उभ्या केल्या. मुंबई व उपनगरात झोपड्या उभ्या राहण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. ठाणे महापालिका हद्दीत मुंब्रा, कळवा या परिसरात अनेक शासकीय भूखंडावर अतिक्रमण झाले. दिव्यात खारफुटी जाळून रातोरात इमारती उभ्या राहिल्या. घोडबंदर रोड येथेही बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. देशाचा समन्यायी विकास न झाल्याने उत्तरेकडील अविकसित राज्यातून रोजगारासाठी लोंढे येतात. अनेकांना रोजगार मुंबईत मिळाला तरी वास्तव्याकरिता ते पूर्व वा पश्चिम उपनगरात आसरा घेतात. त्यामुळे वसई-विरार किंवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरात घरांची मागणी वाढली. याचा गैरफायदा भूमाफियांनी उचलला. खासगी, सरकारी अशा सर्वच भूखंडांवर इमारती उभ्या केल्या.
दंगलीनंतर मुंब्र्यात दाटीवाटी
मुंबईत १९९२-९३ मध्ये दंगल झाली. त्यानंतर मुंबईतून मोठ्या प्रमाणावर मुंब्रा परिसरात स्थलांतर झाले. मुंब्र्याच्या डोंगराच्या पायथ्यापासून वरवरपर्यंत हजारो झोपड्या उभ्या राहिल्या. मुंब्र्यातील या डोंगरावर उभ्या राहिलेल्या झोपड्यांतून होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे पारसिकचा बोगदा धोकादायक झाला. एकेकाळी जलद लोकलची वाहतूक या बोगद्यातून व्हायची. कालांतराने येथील वाहतुकीवर वेगमर्यादा घातल्याने लोकल विलंब होऊ लागला. आता पारसिक बोगद्यातून वाहतूक होत नाही. केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचीच वाहतूक होते.
अतिवृष्टीने दिवा बुडाले
मुंबई व उपनगरात २६ जुलै २००५ रोजी ऐतिहासिक पर्जन्यवृष्टी झाली होती. एका दिवसात ९०० ते ११०० मि.मी. पाऊस झाला होता. दिव्यात याच काळात असंख्य अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. मुसळधार पावसामुळे दिव्यातील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अर्थात त्यानंतरही येथील मँनग्रोव्हज जाळून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा भूमाफियांनी सुरू केला. ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे घर खरेदी करणे परवडत नाही ते लोक दिव्यात १२ ते २० लाखांत घर खरेदी करतात.
ठाणे महापालिकेने २०१९ ते २०२४ या कालावधीत नौपाडा-कोपरी, वागळे, लोकमान्य-सावरकर, माजिवडा-मानपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा प्रभागात मिळून ५५१० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ठाण्यात लक्षावधी अनधिकृत बांधकामे उभी असताना सहा वर्षांत झालेली कारवाई किती तुटपुंजी आहे हेच ही आकडेवारी दाखवते.