उल्हासनगरात स्थायी समिती सदस्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:40 PM2020-02-11T23:40:09+5:302020-02-11T23:40:13+5:30
१७ फेब्रुवारीला निवडणूक : ‘साई’च्या तीन नगरसेवकांचे पद रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : साई पक्षाच्या १० नगरसेवकांचे भाजपमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर तीन नगरसेवकांचे स्थायी समितीतील सदस्यपद आयुक्तांनी रद्द केले. आगामी महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार असून त्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेत १२ नगरसेवक असलेल्या साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी ऐन महापौर निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेतला. इदनानी यांच्या निर्णयाला १२ पैकी २ नगरसेवकांनी हरकत घेतल्याने १० नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यामुळे महापालिकेत भाजपचे संख्याबळ ३१ वरून ४१ झाले. मात्र महापालिकेत स्पष्ट बहुमत असतांना बंडखोर १० ओमी समर्थक नगरसेवकांमुळे भाजप ऐवजी शिवसेनेचा महापौर निवडून आला. माजी महापौर व ओमी टीमच्या नगरसेविका पंचम कलानी यांनी साई पक्षाच्या विलिनीकरणानंतर स्थायी समितीत साई पक्षाचे तीन सदस्य कसे? असे पत्र आयुक्तांना दिले. त्यांचे समिती सदस्यपद रद्द करण्याची मागणी केली होती.
महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नगरसेविका पंचम कलानी यांच्या पत्रावरून स्थायी समितीतील साई पक्षाच्या सदस्या ज्योती भटिजा, दीप्ती दुधानी व दीपक सिरवानी यांचे पद रद्द ठरविले. रिक्त झालेल्या तीन स्थायी समिती सदस्यांची निवडणूक १७ फेबु्रवारीच्या महासभेत होणार असून सदस्य पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली. ज्योती भटिजा, दीप्ती नावानी, दीपक सिरवानी यांचे समिती सदस्यपद आयुक्तांनी रद्द केल्याने पुन्हा त्यांच्याच निवडीला भाजपने हिरवा कंदील दिला. मात्र इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे पक्ष वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ३ पैकी २ भाजप सदस्य निवडून जाऊ शकतात. तर एका जागेसाठी भाजप व साई पक्षाचे गुण समसमान होत असल्याने, त्याबाबतचा निर्णय महासभेत घेण्यात येणार आहे. साई पक्षात गजानन शेळके व सविता तोरणे हे दोन नगरसेवक आहेत.
स्थायी समितीत
भाजपचे बहुमत
स्थायी समितीमध्ये भाजप व साई पक्षाचे १६ पैकी ९ सदस्य होते. स्थायी समितीमध्ये बहुमत मिळणार अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. शिवसेना-५ व रिपाइं व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ असे एकूण ७ सदस्य आहेत.