केडीएमसी सभापती निवडणूक: पाच महिन्यांच्या पदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:37 PM2020-10-04T23:37:00+5:302020-10-04T23:37:13+5:30
आज जाहीर होणार तारीख
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सभापतीपद निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे परिवहन समितीमधील बलाबल पाहता या निवडणुकीत पारडे जड आहे. त्यामुळे या पदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमध्ये भाजपमधील कोणत्या सदस्याला सभापतीपदी संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक उशिराने होत आहे. त्यामुळे नवनियुक्त सभापतीला पाच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
परिवहन समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. समितीमधील शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांचे निधन झाल्याने शिवसेनेची एक जागा रिक्त आहे.
स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे. परिवहन समिती सभापतीपदाचा कार्यकाल एक वर्षाचा असतो. मार्चमध्ये शिवसेनेचे सभापती मनोज चौधरी यांचा कार्यकाल संपुष्टात आला होता. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावात सभापतीची निवडणूक होऊ शकली नव्हती. यात विद्यमान सभापती चौधरी यांना मुदतवाढ मिळाली. अखेर, ही रखडलेली निवडणूक आॅनलाइन प्रक्रियेद्वारे आता होणार आहे. केडीएमटी सभापतीपदाची निवडणूक आॅनलाइन पद्धतीने घेण्यासंदर्भात नव्याने आदेश जारी झाल्याने कोकण आयुक्तांकडून या निवडणुकीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्याकडून जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपकडून कुणाला मिळते संधी?
भाजपच्या सहा सदस्यांपैकी संजय राणे, प्रसाद माळी आणि संजय मोरे यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. राणे आणि मोरे यांची अभ्यासू सदस्य म्हणून समितीमध्ये वेगळी ओळख आहे. परिवहन उपक्रमाच्या उदासीन कारभारावर वेळोवेळी या दोघांनी समितीच्या सभेत आवाज उठविला आहे. या दोघांपैकी एकाला संधी मिळते की, या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाला सभापतीपदावर संधी दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.