रोशनी गरोदर नव्हे, कृत्रिम गर्भधारणेसाठी प्रयत्नशील; उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 06:00 AM2023-04-05T06:00:08+5:302023-04-05T06:00:27+5:30
दोनदा प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आढळली
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शिवसेना ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या गरोदर नसल्याचा निर्वाळा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. उमेश आलेगावकर यांनी मंगळवारी दिला. त्यासाठी त्यांची दोनदा प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली व ती निगेटिव्ह आढळली. रोशनी यांना मुका मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, केवळ वैद्यकीय देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, असे डॉ. आलेगावकर म्हणाले.
फेसबुकवर पोस्ट करण्यावरून शिंदे यांना शिवसेना शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री मारहाण केली. शिंदे काम करतात त्या शोरूममध्ये जाऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे या गर्भवती असूनही त्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. परंतु, वैद्यकीय चाचण्यांमध्ये ती महिला गर्भवती नसल्याचे उघड झाले आहे. शिंदे या गरोदर नसल्या तरी कृत्रिम गर्भधारणेकरिता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.