रोशनी शिंदे यांच्या संरक्षणावरून तूतू - मैंमैं, शिवसेना महिला आघाडीचे पोलिसांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 08:34 AM2023-04-07T08:34:41+5:302023-04-07T08:40:33+5:30
रोशनी शिंदे यांच्या मारहाणीचे ठाकरे गटाकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : रोशनी शिंदे यांच्या मारहाणीचे ठाकरे गटाकडून राजकारण सुरू असून त्यांच्या जिवाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धोका आहे. त्यामुळे रोशनी यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली. त्यावर अगोदर रोशनी शिंदे यांची मारहाण झाल्याची तक्रार दाखल करून घ्या, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
रोशनी हिचा केवळ राजकीय वापर करून घेतला जात आहे. तिला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. रोशनीच्या माध्यमातून ठाकरे आणि राष्ट्रवादी यांचा सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते व राष्ट्रवादीकडून रोशनी हिच्या जिवाला धोका असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला. त्यामुळे तिला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मीनाक्षी शिंदे यांच्या मागणीचा आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. राजकारण बाजूला राहू द्या. स्त्रीचे पूर्णत्व हे मातृत्व असते. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली हे महाराष्ट्राला माहीत आहे. रोशनी तुमची बहीण आहे. कमीत कमी तिची तक्रार नोंदवून घ्यायला सांगा, असा सल्ला त्यांनी दिला. खरेच तिला संरक्षण द्यायला सांगा नाही तर सगळ्या पोलिस स्टेशनचा स्टाफ कमी आहे, अजून एक कमी होईल, आधीच ५०० पोलिस बंदोबस्त करीत आहेत, हे संरक्षण गुडांना दिल्याचा आराेप आव्हाड यांनी केला.