कोरोनाकाळातही ‘रोटरी’ने दोन बंधारे बांधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:52+5:302021-07-01T04:26:52+5:30
ठाणे : एकीकडे सारे जग कोरोनाविरुद्ध लढ्यात गुंतलेले असताना सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी ...
ठाणे : एकीकडे सारे जग कोरोनाविरुद्ध लढ्यात गुंतलेले असताना सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वेळी ‘रोटरी’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने टिटवाळ्याजवळ दोन बंधारे बांधले आहेत.
अंखर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हस्कळ गावात ही योजना राबवून गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनने इंग्लंडमधील वॉलसॉल रोटरी क्लबच्या साहाय्याने हा बंधारे प्रकल्प राबविला. यामुळे सुमारे एक कोटी लिटर अडविले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील भूगर्भ पाण्याची पातळी वाढणार आहे. जमिनीत पाणी झिरपल्यामुळे गावकऱ्यांना भाजीपाला लागवड करण्यास हातभार लागणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या पावसात ही धरणे वाहू लागली होती. अलीकडेच या दोन धरणांचे रोटरीचे प्रांतपाल डॉ. संदीप कदम यांच्या हस्ते ऑफलाईन उद्घाटन झाले. यावेळी प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे रोटेरियन संतोष भिडे, माजी अध्यक्ष राजेंद्र झेंडे, विद्यमान अध्यक्ष संजय जोगळेकर, मिडटाऊनचे संस्थापक-सदस्य पत्रकार मिलिंद बल्लाळ, आदी उपस्थित होते. म्हस्कळ गावातील रहिवाशांनी या योजनेचे स्वागत केले असून, रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि कल्याण रिव्हरसाईड क्लबचे आभार मानले आहेत. रोटरी क्लब ऑफ वॉलसॉलचे अध्यक्ष आणि मूळचे ठाणेकर असणारे डॉ. मुकुंदा चिद्रवार, बिर्ला इस्टेटचे सर्व अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले, असे बडे यांनी सांगितले.