अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी फिरता दवाखाना; खासदार व वनरुपी क्लिनीकच्या माध्यमातून सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 02:06 PM2020-04-07T14:06:20+5:302020-04-07T14:30:36+5:30
फिरत्या दवाखानाची दोन पथके कार्यरत
कल्याण- कोरोनाची लागण पसरू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी आहे. यावेळी अहोरात्र कर्तव्य बजाविणा:या पोलिसांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. त्यांनाही कोरोनाची लागण होऊ शाकते. त्यासाठी त्यांची तपासणी होणो आवश्यक आहे. त्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारने फिरता दवाखाना आजपासून सुरु करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून कर्तव्य बजावित असलेल्या पोलिसांची तपासणी केली जाणार आहे.
ठाणे शहरापासून हे तपासणी सुरु करण्यात आली आहे. दोन पथके कार्यरत राहणार आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व वनरुपी क्लीनिक्सच्या माध्यमातून हा फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. थर्मल स्कॅन मशीनच्या माध्यमातून शरीरातील तापमानाची चाचणी केली जाणार आहे. आजच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील नितीन कंपनीनजीक बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलिसांच्या शरीराचे तापमान जास्त असल्याचे तपासणीतून दिसून आले. त्याना चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दोन तपासणी पथके ठाणो ते अंबरनाथ दरम्यान सर्व शहरांसह ग्रामीण भागात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची तपासणी करणार आहेत अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान चार दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत खासदार शिंदे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकी दरम्यान कल्याण शीळ रोडवरील नियॉन या खाजगी रुग्णालयाने कोरोना उपचारासाठी सेवा देण्यासाठी पुढाकार दर्शविला होता. आज या रुग्णालयाची खासदार शिंदे यांनी पाहणी केली. या रुग्णालयात सुसज्ज असे 32 बेड्स आहे. तसेच 12 बेड्स हे आयसीयू सुविधांनी सज्ज आहेत. या रुग्णालयासोबत महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. हे रुग्णालय केवळ कोरोना बाधित रुग्णांना उपचार देणार आहे.
कोरोना बाधितांकरीता महापालिकेने शास्त्रीनगर रुग्णालय आसोलेसन रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. मात्र कल्याण ग्रामीण भागात कोरोना उपचारासाठी सोय नसल्याने पडले गावातील नियॉन रुग्णालयात उद्यापासून आरोग्य सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना उपचारासाठी दिलासा मिळाला आहे.