ठाणे महापालिकेतर्फे फिरती विसर्जन व्यवस्था
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 8, 2024 03:18 PM2024-09-08T15:18:47+5:302024-09-08T15:19:00+5:30
आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले लोकार्पण.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. या महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून त्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. विसर्जनाची व्यवस्था असलेला हा ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे.
कृत्रिम तलाव, टाकी व्यवस्था याप्रमाणेच महापालिकेने यंदा फिरत्या विसर्जन व्यवस्थेचा प्रयोग केला आहे. सध्या चार प्रभाग समितींमध्ये वेळापत्रकानुसार हे ट्रक फिरणार आहेत. गणेश भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राव यांनी लोकार्पण प्रसंगी केले. त्यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यात, ०९ विसर्जन घाट, १५ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे.
यावर्षी ही फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध असेल. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, 'पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२४' या शीषर्कावर उपलब्ध उपलब्ध करण्यात आले आहे. , अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.