नव्या इलेक्ट्रिक बसचा मार्ग खडतरच, चार्जिंग स्टेशनसह विजेचा खर्च भागविण्यासाठी अनुदानाचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 11:49 PM2021-02-16T23:49:04+5:302021-02-16T23:49:28+5:30
electric bus : ठाण्यातील प्रदूषणात घट करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने १०० इलेक्ट्रिक बसेस पीपीपी तत्त्वावर घेण्याचे निश्चित केले होते.
ठाणे: ठाणे परिवहनच्या सेवेत एकमेव असलेली इलेक्ट्रिक बस सध्या बंद अवस्थेत आहे. उर्वरित ९९ बस सध्या तरी सेवेत दाखल होणार नसल्याचेच दिसत होते, परंतु आता परिवहनने एमएमआरडीएकडून १०० इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्या सेवेत आल्या, तरी त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशनसह विजेचा खर्च हा परिवहनला परवडणारा नाही. त्यामुळे हा खर्च भागविण्यासाठी सबसिडीचा आधार घ्यावा लागणार आहे, परंतु तो मिळणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्राने तो दिला नाही, तर मात्र या बसची अवस्थाही पहिल्या बसप्रमाणेच होईल, अशी शक्यता आतापासूनच वर्तविली जात आहे.
ठाण्यातील प्रदूषणात घट करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने १०० इलेक्ट्रिक बसेस पीपीपी तत्त्वावर घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, चार वर्षांपूर्वी या संदर्भातील प्रस्ताव मंजूर केला होता. पार्किंग, बस थांबा, चार्जिंग स्टेशन यासाठी लागणारी जागा ठेकेदार कंपनीला महापालिका विनामूल्य देणार होती, तर तिकिटापासून मिळणारे सर्व उत्पन्न ठेकेदार कंपनीला मिळणार होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या बसची वाट ठाणेकर पहात आहेत. जी एक इलेक्ट्रिक बस ठाण्यातील रस्त्यावर धावत आहे, तिच्या बॅटरी काही महिन्यांतच खराब झाल्यामुळे, नव्याने उच्च दर्जाच्या बॅटरी तिला बसवाव्या लागल्या, तर उर्वरित बसच्या बॅटरी बदलण्यात येत असल्याने, इतर बसचे आगमन लांबले असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, एकाच वेळी सर्व बस आल्या, तर त्यांच्यासाठी पुरेशी चार्जिंग स्टेशन नसल्यामुळेच त्या येऊ शकल्या नाहीत. असे असताना आता ठेकेदार कंपनीनेच यातून काढता पाय घेतल्याने, आहे ती एक बसही धूळखात आहे.
बस चार्जिंगचा सौदा पडतो महागात
ठाणे: परिवहन सभापती विलास जोशी यांनी एमएमआरडीएकडून १०० नव्या इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, त्यासाठी परिवहनला स्वत:चे चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार आहे. सुरुवातीला चार्जिंग केल्यानंतर एक बस २४० किमी चालते असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात एकदा चार्जिंग केल्यानंतर एक बस १६० ते १७० किमी बस चालते.
एका बसची बॅटरी चार्ज करण्यासाठी ७ कि.वॅट वीज लागते आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी ११ रुपये प्रति युनिट दर असल्याने हा सौदा महागात पडणार आहे. मुंबईत बेस्टकडून इलेक्ट्रिक बसेसच्या बॅटऱ्या चार्ज करण्यासाठी स्वस्त दरात वीज दिली जाते. ठाणे महापालिकेला तशी सवलत मिळत नाही. मुंबई-पुण्यात केंद्राने इलेक्टिक बससाठी ६० टक्के सबसिडी दिली आहे.