आरपीएफ जवानाने महिलेला वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 02:58 AM2020-09-01T02:58:44+5:302020-09-01T02:59:01+5:30
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुमंगला वाघ (५४, रा. शंखेश्वर, रामबाग, कल्याण पश्चिम) यांना जितेंद्रकुमार यादव या रेल्वे पोलीस दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखून वाचवले.
डोंबिवली : कल्याण रेल्वेस्थानकानजीक रविवारी सकाळी ९.२७ वाजता मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेसखाली आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुमंगला वाघ (५४, रा. शंखेश्वर, रामबाग, कल्याण पश्चिम) यांना जितेंद्रकुमार यादव या रेल्वे पोलीस दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखून वाचवले.
या घटनेसंदर्भात यादव यांनी सांगितले की, मी कल्याण रेल्वे यार्डात कामावर जात होतो. त्यावेळी पुष्पक एक्स्प्रेस ज्या ट्रॅकवर येत होती, त्या दिशेने सुमंगला जात होती. त्यावेळी आवाज देऊनही तिने ऐकले नाही. म्हणून, मी इंजीनच्या पायलटलाही सांगितले. प्रसंगावधान राखत त्यांनीही इंजीनचा ब्रेक दाबला. पण, तरीही ती महिला काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ती गाडीखाली जात होती. तेवढ्यात, मी तिला खेचून रुळांमधून बाहेर काढले. त्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत.
महिलेची विचारपूस करून तिला काही दुखापत झाली आहे का, याची तपासणी करण्यासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे किरकोळ उपचार करून तिला सुखरूपपणे घरी सोडण्यात आले.
यादव यांचे कौतुक
यादव यांनी प्रसंगावधान राखत महिलेचे प्राण वाचवल्याने त्यांचे लोहमार्ग पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेच्या अन्य वर्तुळात कौतुक होत आहे. वरिष्ठ पातळीवरही त्याची नोंद घेतल्याचे सांगण्यात आले.