रिपाइंला ५, शिवसंग्राम १ जागा?
By admin | Published: January 29, 2017 03:16 AM2017-01-29T03:16:18+5:302017-01-29T03:16:18+5:30
ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा
ठाणे : ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेपाठोपाठ रिपाइंची बोलणी फिस्कटली, तर सत्ताधारी भाजपाला मित्रपक्षांना सांभाळता येत नाही, असा संदेश जातो. त्यामुळे रिपाइंने दबावतंत्राचा अवलंब केला आहे. रिपाइंच्या मागणीवर भाजपाचा
निर्णय काय होणार, ते येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, रिपाइंला ५ तर शिवसंग्रामला १ जागेखेरीज जास्त जागा सोडण्यास भाजपा तयार नाही, असे संकेत प्राप्त झाले आहेत.
शिवसेनेबरोबरची युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली, तेव्हाच भाजपाने रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या युतीच्या मित्रपक्षांना आपल्याकडे खेचले. रिपाइंचे
रामदास आठवले सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. रिपाइंसोबत जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रिपाइंला किती आणि कोणत्या जागा दिल्या जाऊ शकतात, याचा अंदाज भाजपा घेत आहे.
मात्र, तेवढ्यात रिपाइंने अचानक आपला दावा २० जागांवरून ३० जागांवर वाढवला आहे. भाजपाची लढत शिवसेनेबरोबर असून भाजपाकरिता प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. रिपाइंला जास्तीतजास्त ४ ते ५ जागा देण्याची भाजपाची तयारी आहे. ‘शिवसंग्राम’ संघटनेने भाजपाकडे १६ जागा मागितल्या आहेत. या पक्षाला केवळ एक किंवा दोन जागा भाजपा देऊ शकते.
येत्या मंगळवार, ३१ जानेवारीस माघी गणेशोत्सवास प्रारंभ होत असून उमेदवारांचे अर्ज दाखल करणे सुरू होईल. तत्पूर्वी म्हणजे रविवार-सोमवारी भाजपाचे स्थानिक नेते व रिपाइं, शिवसंग्रामचे नेते यांच्यात जागावाटपाचा फैसला होणे अपेक्षित आहे. समजा, हे पक्ष आपापल्या दाव्यांवर ठाम राहिले, तर त्यांच्याशी वाटाघाटी न करता अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही प्रबळ बंडखोरांची बंडखोरी काबूत आणता येईल. किरकोळ बंडखोरीची दखल न घेण्याचे धोरण भाजपा स्वीकारेल, असे समजते. (प्रतिनिधी)
भाजपाकडून चर्चेला सुरुवात झाली असून त्यांच्याकडे आम्ही आता २० नाही तर ३० जागा मागितल्या आहेत. चर्चेअंती किती जागा मिळतील, त्यावरच पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
-रामभाऊ तायडे, रिपाइं, ठाणे शहराध्यक्ष, आठवले गट