रिपाइंला युतीकडून हव्यात २० जागा
By admin | Published: January 8, 2017 02:42 AM2017-01-08T02:42:16+5:302017-01-08T02:42:16+5:30
शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांची युती होण्याची चिन्हे दिसत नसताना रिपाइंने (आठवले गट) या दोन्ही पक्षांकडे २० जागा मागितल्या आहेत. मात्र, युतीचाच तिढा सुटू
ठाणे : शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांची युती होण्याची चिन्हे दिसत नसताना रिपाइंने (आठवले गट) या दोन्ही पक्षांकडे २० जागा मागितल्या आहेत. मात्र, युतीचाच तिढा सुटू न शकल्याने रिपाइंबरोबर जागावाटपाची चर्चा झालेली नाही. जागावाटपात योग्य सन्मान झाला नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा ठाणे शहर रिपाइंने दिला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. शिवसेना आणि भाजपाची स्थानिक मंडळी स्वबळाची भाषा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर रिपाइं (आठवले) गटाने ही मागणी केली आहे. मागील निवडणुकीत रिपाइंने शिवसेनेबरोबर संधान साधून १० जागा पदरी पाडून घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत रिपाइंने शिवसेनेची साथ सोडून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. रिपाइंचे नेते रामदास आठवले सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत. शिवसेनाही भाजपा सरकारमध्ये सामील आहे. त्यामुळे आता भाजपा व शिवसेना या दोघांनी प्रत्येकी १० याप्रमाणे २० जागा सोडाव्या, अशी मागणी आठवले गटाने केली आहे. शिवसेना रिपाइंला फारच कमी जागा देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपाने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. शिवसेनेबरोबर टक्कर द्यायची असेल, तर एकेक जागा त्यांच्याकरिता महत्त्वाची आहे. रिपाइंला किती जागा दिल्या जाऊ शकतात, याबाबत सध्या भाजपा काहीच सांगण्यास तयार नाहीत. विधानसभेला भाजपासोबत व मागील ठामपा निवडणुकीत शिवसेनेबरोबर गेलेली रिपाइं आता कुणाबरोबर जाते, कोण तिला जास्त जागा सोडते की, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, अशी या पक्षाची स्थिती होते, याकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
आम्ही दोघांकडे २० जागांची मागणी आहे. परंतु, अद्याप त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळू शकलेले नाही. त्यामुळे आमचा विचार झाला नाही, तर आम्ही स्वबळावरदेखील लढू.
- रामभाऊ तायडे,
रिपाइं, ठाणे शहराध्यक्ष