प्लाझ्मा थेरपीकरिता उकळले ११ हजार रुपये; रक्तपेढीवर आरोप,आयुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:47 AM2020-09-03T01:47:21+5:302020-09-03T01:47:29+5:30

प्लाझ्मा थेरपीकरिता घेतलेली ही रक्कम बरीच जास्त असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला असून महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

Rs 11,000 for plasma therapy; Allegations against the blood bank, complaint to the Commissioner | प्लाझ्मा थेरपीकरिता उकळले ११ हजार रुपये; रक्तपेढीवर आरोप,आयुक्तांकडे तक्रार

प्लाझ्मा थेरपीकरिता उकळले ११ हजार रुपये; रक्तपेढीवर आरोप,आयुक्तांकडे तक्रार

Next

कल्याण - कोरोना रुग्णांवर उपचार करणारी खाजगी कोविड रुग्णालये जास्त रकमेची बिले आकारून रुग्णांची लूट करीत असल्याचे प्रकार यापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत निदर्शनास आले असतानाच आता एका कोरोना रुग्णाकडून प्लाझ्मा थेरपीचे उपचार करण्यासाठी महापालिका रुग्णालयातील रक्तपेढीकडून ११ हजार रुपये घेण्यात आले आहेत. प्लाझ्मा थेरपीकरिता घेतलेली ही रक्कम बरीच जास्त असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला असून महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात राहणारे प्रदीप मिसर हे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांचा पुतण्या पोलीस दलात कार्यरत आहे. त्याला कोरोनाची बाधा झाली. त्याच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचे कुटुंबीयांनी ठरवले. मिसर यांनी पुतण्याला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले असता त्याठिकाणी असलेल्या अर्पण रक्तपेढीने प्लाझ्मा थेरपीसाठी ११ हजार रुपये आकारले.
मिसर यांनी खाजगी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी किती पैसे घेतात, याची चौकशी केली असता सहा ते साडेसात हजार रुपये आकारले जातात, असे त्यांना सांगण्यात आले. महापालिकेच्या रुग्णालयाने जास्तीचे पैसे आकारल्याने त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली आहे.
महापालिका रुग्णालयातील रक्तपेढीकडून जास्तीचे पैसे उकळल्याने संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी भाजपचे गटनेते शैलेश धात्रक यांनी आयुक्तांकडे केली.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या की, महापालिकेच्या रक्तपेढीने जास्तीचे पैसे आकारले, याची तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र, ती प्राप्त होताच तक्रारीची शहानिशा करून संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.
यासंदर्भात अर्पण रक्तपेढीने सांगितले की, महापालिकेने रक्तपेढीस अमुक एक दर आकारावा, असे दरपत्रक ठरवून दिलेले नाही. त्यामुळे रुग्णाकडून जास्तीचे पैसे आकारले या आरोपात तथ्य नाही. मिसर यांचे बिल १२ हजार रुपये झाले होते. मात्र, रक्तपेढीने त्यात एक हजार रुपयांची सूट दिली होती.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच रुग्णालये व रक्तपेढ्यांकडून अशा प्रकारे लूट सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

चौकशी करणार - महापौर
महापौर विनीता राणे म्हणाल्या की, याबाबत तक्रार प्राप्त झाली असून चौकशी केली जाईल. पैसे जास्तीचे आकारण्यात आले असतील, तर संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाईल.

Web Title: Rs 11,000 for plasma therapy; Allegations against the blood bank, complaint to the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.