ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेडसाठी घेतले दीड लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:49+5:302021-04-23T04:42:49+5:30
ठाणे : ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड मिळावा म्हणून वसईतील रुग्णाच्या मुलाकडून दीड लाख रुपये उकळले असल्याचा आरोप मनसेने ...
ठाणे : ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड मिळावा म्हणून वसईतील रुग्णाच्या मुलाकडून दीड लाख रुपये उकळले असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या तरुणासाेबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मनसेने मीडियासमोर आणली आहे. यासंबंधी पालिका प्रशासनाने या प्रकरणात पैसे घेतल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे म्हटले आहे.
प्रवीण बाबर या तरुणाच्या वडिलांना ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये ॲडमिट करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आराेप मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. यासंबंधी सर्व पुरावे आमच्याकडे असल्याचा दावाही जाधव यांनी केला आहे. तसेच, हे सर्व पुरावे अतिरिक्त आयुक्तांना दाखविले आहेत. त्यांनाही धक्का बसला असून त्यांचे या तरुणाशी फोनवर बोलणे करून दिल्याचे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच, या तरुणासोबत संभाषण झाल्याची ऑडिओ क्लिप मनसेने मीडियाला दिली आहे. त्यात या तरुणाने सांगितले की, शेख नावाच्या व्यक्तीने गेटच्या बाहेर दीड लाख रुपये घेतले. खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हता म्हणून शेवटचा पर्याय म्हणून ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीनंतर ३ वाजता आलो. पहाटे साडेचार वाजता वडिलांना ॲडमिट केले. तसेच शेख नावाच्या व्यक्तीने मंत्र्यापर्यंत पैसे जातात असे आपल्याला सांगितले. या क्लिपमध्ये ताे जाधव यांच्याशी बाेलत हाेता.
-------------------
ग्लोबल हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होत असताना पैसे घेतले गेले अशी तक्रार आमच्याकडे आली आहे. ही घटना प्रथमदर्शनी अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. प्रशासन अशा गोष्टी खपवून घेणार नाही. या प्रकरणाची चौकशी होऊन यात तथ्य आढळल्यास आणि पैसे घेताना काेणी निदर्शनास आले तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.
- गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका
---------------
पीडित तरुणाने केलेल्या आराेपांची चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहोत. - अविनाश जाधव, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष