कोणार्क बँकेच्या सीईओने केली २५ कोटींची फसवणूक, उल्हासनगरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:23 AM2018-02-10T01:23:50+5:302018-02-10T01:23:57+5:30
कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेत १६ कंपन्या उघडून २५ कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर : कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेत १६ कंपन्या उघडून २५ कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.-३ परिसरात कोणार्क बँक आहे. निर्मल भाटिया यांनी त्यांचे मित्र सतीश हर्षलानी व महेश हर्षलानी यांना त्यांच्या पाच कंपन्यांसाठी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीच्या सहा कोटींसाठी कोणताही मोबदला न घेता मालमत्तेची मूळ कागदपत्रे कोणार्क बँकेमार्फत ठाण्यातील भारत सहकारी बँकेला द्यावी लागतात, असे सांगून ती घेतली होती. पण, मूळ कागदपत्रे पाठवली की नाही, हे कळू शकलेले नाही.
भाटिया यांच्या मूळ कागदपत्रांचा वापर माखिजा यांच्यासह बँकेतील व बाहेरील सहकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मूळ कागदपत्रांची बनावट कागदपत्रे, स्टॅम्प व सह्या
करून त्यांच्या नावाने वेगवेगळ्या
१६ कंपन्या उघडून कोट्यवधींचे कर्ज मंजूर केले.
भाटिया यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळ्या १६ कंपन्यांच्या खात्यांत कर्जाची जमा झालेली २५ कोटी ६० लाखांची रक्कम माखिजा व इतरांनी काढून फसवणूक केली, अशी तक्रार भाटिया यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली आहे. ५ मार्च २०१५ ते आजपर्यंत हा प्रकार झाला आहे. मध्यवर्ती पोलिसांनी निर्मल भाटिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
चुकीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
निर्मल भाटिया यांनी केलेली तक्रार खोटी असून पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल करायला हवा होता. या प्रकाराने बँकेची बदनामी होत असल्याची प्रतिक्रिया नवे सीईओ ग्वालानी यांनी दिली. याबाबत, वरिष्ठ स्तरावर दाद मागणार असल्याचे ग्वालानी म्हणाले.