वीजग्राहकांकडे तब्बल ५८७ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 03:06 AM2018-06-22T03:06:01+5:302018-06-22T03:06:01+5:30
महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळ हद्दीत सहा लाख ९९ हजार ग्राहकांकडे ५८७ कोटी ९० लाख रुपयांची चालू थकबाकी आहे.
कल्याण : महावितरण कंपनीच्या कल्याण परिमंडळ हद्दीत सहा लाख ९९ हजार ग्राहकांकडे ५८७ कोटी ९० लाख रुपयांची चालू थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे. तसेच या मोहिमेचे आॅडिटही केले जाणार आहे.
कल्याण परिमंडळात २८ लाख ३९ हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी सहा लाख ९९ हजार ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे आदेश मुख्य अभियंता रफीक शेख यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. विजेचे बील दोन महिनांपासून थकीत असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित केला जाणार आहे. वसुलीची मोहीम तीव्र करण्यासाठी फिल्ड अधिकारी वाढवण्याची गरज आहे, असे शेख म्हणाले.
महावितरणच्या कार्यालयातून देण्यात येणारे वीजमीटर, त्याचा होणारा वापर, स्टोअर रूममध्ये असलेला साठा याचा ताळेबंदही तपासावा, तसेच मिटर रिडिंगचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही शेख यांनी दिल्या आहेत.