उच्च शिक्षिताला घातला ४९ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:48 AM2019-01-23T04:48:45+5:302019-01-23T04:48:51+5:30
ऑनलाईनच्या माध्यमातून उच्च शिक्षिताला सुमारे ४९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना सोमवारी डोंबिवलीत उघडकीस आली.
डोंबिवली : ऑनलाईनच्या माध्यमातून उच्च शिक्षिताला सुमारे ४९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना सोमवारी डोंबिवलीत उघडकीस आली. महागडे मोबाइल आणि टीव्ही घेण्यासाठी त्यांनी चक्क आपल्या मित्रांकडून उसने पैसे घेतले, बँकांकडून कर्ज काढले. त्यानंतर याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सेल्स मॅॅनेजर ए. आर. कनिश, सेल्स मॅनेजर मोहम्मद इब्राहिम युसुफ, क्लेअरिंग एजंट अरुण जोश, डिलिवरी मॅन अॅलेक्स आणि फिलीप या पाच जणांविरोधात त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ठाकुर्ली परिसरातील राहणारे भारत कुमार (नावात बदल) हे मुंबईतील एका कंपनीत कॉम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून कामाला आहेत. आॅगस्ट २०१७ मध्ये एका सोशल साईटच्या माध्यमातून भारत कुमार यांची ए. आर. कनिश नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. याच ओळखीतून कनिशने महागडे मोबाइल आकर्षक किमतीत देण्याचे प्रलोभन भारत कुमार यांना दाखवले. नंतर, संबंधित मोबाइल कंपन्यांची माहिती म्हणून कंपनीचा मालक (सेल्स मॅनेजर) मोहमद युसुफ याचे कंपनीचे ओळखपत्र पाठवून आॅर्डर फॉर्म मेल केला. त्याप्रमाणे भारत कुमार यांनी एक टीव्ही, एक आयपॅड आणि दोन महागड्या मोबाइलची बुकिंग केली. यासाठी आगाऊ रक्कम म्हणून २० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यासदेखील सांगितले. त्यानंतर आॅगस्ट २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत कुमार यांनी ४८ लाख ९० हजार रुपये ट्रान्सफर केल्यानंतर ठगाने त्याचे मोबाइल नंबर बंद केले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुमार यांनी रामनगर पोलिसांत सोमवारी तक्रार दाखल केली.