विवाहितेवर बलात्कार करून ५.५० लाखांच्या खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 09:58 PM2017-10-06T21:58:41+5:302017-10-06T21:58:58+5:30
आरटीआय कार्यकर्ता असल्याची बतावणी करून कळव्यातील एका विवाहितेवर पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार करण्यात आला.
ठाणे : आरटीआय कार्यकर्ता असल्याची बतावणी करून कळव्यातील एका विवाहितेवर पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार करण्यात आला. कहर म्हणजे यातील आरोपीच्या पत्नीनेच पीडित महिलेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा पीडित महिलेकडेच साडेपाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. प्रकरण हाताबाहेर गेल्यामुळे अखेर याप्रकरणी पीडित महिलेने कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
केवळ आरटीआय कार्यकर्ता असल्याचा जोरावर विशाल मोरे (नावात बदल) हा या पीडित महिलेला २०१५ पासून ते २० जुलै २०१७ या कालावधीत वेगवेगळी माहिती मागवण्याच्या नावाखाली मानसिक छळ करीत होता. मोबाइलवर फोन करून तो तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तिने त्याला विरोध केल्यानंतर त्याने पती आणि मुलाला ठार मारण्याची तसेच नोकरीही घालून टाकण्याची धमकी दिली. नंतर तिला जांभळीनाका येथील एका लॉजवर बोलावून तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्या प्रकाराचे अश्लील फोटो काढले. ते विशालची पत्नी शोभना (नावात बदल) हिने पीडित महिलेच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून तिच्याकडेच साडेपाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम दिली नाही, तर पतीसह तुझ्या नातेवाइकांना हे फोटो पाठवण्यात येतील, अशीही धमकी तिला दिली.
या सर्वच प्रकाराचा कळस झाल्यानंतर सुरुवातीला बदनामी नको, म्हणून गप्प राहिलेल्या या महिलेने धाडस करून अखेर या प्रकरणी शहापूरच्या या कथित आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी दाखल केला आहे. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी दिली.