RSS ची तालिबानशी तुलना; जावेद अख्तर यांना न्यायालयाने बजावली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 09:40 PM2021-09-28T21:40:25+5:302021-09-28T21:41:52+5:30
Javed Akhtar : तालिबान आणि ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे त्यांच्यात विलक्षण साम्य असल्याची टिप्पणी जावेद यांनी एका मीडिया संवादामध्ये काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या या टिप्पणीवर ठाणे न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.
ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) थेट तालिबान्यांशी तुलना करून त्यांची बदनामी केल्याबद्दल ठाणे न्यायालयाने लेखक, गीतकार जावेद अख्तर यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तालिबान आणि ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे त्यांच्यात विलक्षण साम्य असल्याची टिप्पणी जावेद यांनी एका मीडिया संवादामध्ये काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या या टिप्पणीवर ठाणे न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.
जावेद अख्तर यांच्या या संवादानंतर शिवसेनेने आरएसएस आणि तालिबानची तुलना करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. आरएसएसचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. सामान्य लोकांच्या नजरेत आरएसएसची बदनामी केल्याबद्दल त्यांनी एक रुपयांची भरपाई मागितली.
आरएसएसला बदनाम करण्यासाठी आणि आरएसएसमध्ये सामील झालेल्या लोकांना निराश करण्यासाठी, अपमानित करण्यासाठी तसेच त्यांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हे विधान सुनियोजितपणे केल्याचा दावाही आपल्या याचिकेमध्ये चंपानेरकर यांनी केला आहे.