आरटीईच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके नाही, महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन
By अजित मांडके | Published: June 26, 2024 05:03 PM2024-06-26T17:03:50+5:302024-06-26T17:05:18+5:30
विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा या मागणीसाठी बुधवारी काही पालकांनी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.
ठाणे : आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अद्यापही शालेय गणवेश, पुस्तके व इतर साहित्य शाळेच्या वतीने देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा या मागणीसाठी बुधवारी काही पालकांनी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.
केंद्र सरकारने वंचित दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासकीय अनुदानित खाजगी शाळांमध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेशाच्या कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, लेखनसाहित्य व गणवेश पुरविण्याची जबाबदारी ही शाळेची असल्याचे स्पष्ट केले आहे. असे नमुद असतांनाही खाजगी शाळा मात्र विद्यार्थ्यांना गणवेश व इतर साहित्य देत नसल्याचा आरोप प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी केला. मागील वर्षी देखील विद्यार्थ्यांना या प्रकारामुळे तीन महिने शिक्षणापासून वंचित रहावे लागले होते. त्यातही शासन आम्हाला पैसे देत नसल्याने आम्ही देखील पाठ्यपुस्तके व इतर साहित्य पुरवू शकत नसल्याचे म्हणने शाळा व्यवस्थापनाचे आहे. परंतु यात शालेय विद्यार्थी भरडला जात असून त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे अशा शाळांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान आंदोलनकर्त्यांनी यावेळी ठामपा शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी नियमानुसार दोन दिवसात गणवेश, पुस्तके व इतर साहित्य शाळांनी द्यावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.