ठाणे, पालघरमध्ये एकाच दिवसात ५३७ बसवर आरटीओची कारवाई; ३० वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:27 AM2021-02-10T01:27:37+5:302021-02-10T01:27:52+5:30
परिवहन विभागाचे आदेश : प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह २५ अधिकारी रस्त्यावर
ठाणे : राज्यभर चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्यासह २५ अधिकाऱ्यांच्या चमूने ५३७ वाहनांवर कारवाई केली. तर ३० बसेस जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान एकाच वेळी ही मोहीम राबविण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील परिवहन अधिकाऱ्यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पडघा, घोडबंदर रोड, कळवा - खारेगाव नाका आणि पालघर चेक पोस्ट तसेच नवी मुंबई आणि कल्याण या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यावेळी स्वत: ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांच्यासह मुख्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, अंमलबजावणी विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील सर्व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहन निरीक्षक आणि सहायक मोटर वाहन निरीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या चमूने ही कारवाई ठिकठिकाणी केली. यामध्ये विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीरपणे फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक आणि मोटार वाहन कर बुडविणे आदी बाबींची पडताळणी करण्यात आली. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तीन हात नाका येथे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस पकडण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी आरटीओने अशाच प्रकारे ओव्हरलोड वाहतूक तसेच अवैध प्रवासी वाहतूकीवर कारवाई केली होती. कारवाया थंडावल्यानंतर पुन्हा अवैध वाहतूक सुरु झाली. त्यामुळे राज्यभर अशा प्रकारे पुन्हा कारवाईचे आदेश परिवहन कार्यालयाने दिले होते. या कारवाईमध्ये अवघ्या १२ तासांमध्ये पडघा येथे ७५ बसेसवर कारवाई झाली. दोन बसेस जप्त करण्यात आल्या. त्यापाठोपाठ तीन हात नाका येथे ८० बसेसवर कारवाई करुन दोन बसेसवर जप्तीची कारवाई झाली. घोडबंदर रोड येथे ३७ कारवाया झाल्या. त्यातील चार वाहने जप्त झाली.
अवैध प्रवासी वाहतुकीबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार ठाणे आणि पालघरमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ५३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर ३० वाहने जप्त करण्यात आली.
- रवींद्र गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे