मीरा भार्इंदरमध्ये आरटीओचे शिबिर कार्यालय पाच दिवस राहणार
By जितेंद्र कालेकर | Published: December 3, 2020 05:12 PM2020-12-03T17:12:18+5:302020-12-03T17:20:30+5:30
आठवडयातून पाच दिवस मीरा भार्इंदर येथे आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु केले जावे, अशी स्थानिक रहिवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर यापुढे मीरा भार्इंदर याठिकाणी पाच दिवस आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मीरा भार्इंदर महापालिका क्षेत्रात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे केवळ तीन दिवसांचे शिबिर कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. ते यापुढे आठवडयातून पाच दिवस सुरु राहणार असल्याची माहिती ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी दिली.
तब्बल २० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मीरा भार्इंदर येथील नागरिकांना वाहन परवाना किंवा शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) तसेच पक्के अनुज्ञप्ती काढण्यासाठी थेट ठाणे गाठावे लागत होते. घोडबंदर रोडने ठाण्यात येतांना या वाहन धारकांना मोठया वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागत असल्यामुळे अनेकांचा यात मोठा वेळ खर्ची होत होता. त्यामुळेच आठवडयातून पाच दिवस मीरा भार्इंदर येथे आरटीओचे शिबिर कार्यालय सुरु केले जावे, अशी स्थानिक रहिवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. याच मागणीचा पाठपुरावा ओवळा माजीवडा येथील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही राज्य शासनाकडे तसेच ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांच्याकडे केली होती. याच मागणीची दखल घेऊन आता आठवडयातील पाच दिवस आरटीओचे हे शिबिर कार्यालय मीरा भार्इंदर येथे १ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. हे कार्यालय घोडबंदर रोडवरील घोडबंदर व्हिलेज, मीरा भार्इंदर बस डेपो, मीरा रोड पूर्व याठिकाणी सुरु राहणार आहे. या शिबिर कार्यालयामुळे मीरा भार्इंदर भागातून केवळ अनुज्ञप्ती काढण्यासाठी ठाण्याकडे येणाऱ्या वाहन धारकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. शिवाय, अनुज्ञप्तीचा कोटाही वाढविण्यात आल्यामुळे शिकाऊ अनुज्ञप्ती घेणाऱ्यांनाही चाचणी देण्याची वेळ लवकर दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.