प्रायव्हेट बसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला वेळ मिळेना, वाहतुक पोलिसांनी केले आरटीओला टारगेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:13 PM2017-12-05T17:13:29+5:302017-12-05T17:16:10+5:30
खाजगी बसेवर वारंवार कारवाई होऊनही या बसेसचा वेग आणखीनच सुसाट होऊ लागला आहे. ठाणे परिवहन प्रशासनाने या बसेसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला टारगेट केल्यानंतर आता वाहतुक पोलिसांनी देखील आरटीओकडेच बोट दाखविले आहे.
ठाणे : ठाणे पूर्वेतून सुटणाऱ्या खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे. महापालिकेने त्यांच्यावर कारवाईसाठी आरटीओकडे बोट दाखविले असतांना आता वाहतूक पोलिसांनीदेखील आरटीओलाच जबाबदार धरले आहे. असे असले तरी या बसना लगाम कोण घालणार असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वीदेखील समितीने कोपरी येथून होणाऱ्या खाजगी बसच्या विरोधात आंदोलन उभारले होते. त्यानंतर त्या काही दिवसांसाठी का होईना बंद झाल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलीस आणि संबंधीत आरटीओ प्रशासनानेदेखील यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आज आठ महिने उलटून गेल्यानंतरही त्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही. कोपरीमध्ये आंदोलन झाल्यानंतर या बस बंद होतील असे वाटत होते. परंतु, आजही त्या सुसाट सुरूच आहेत. टीएमटीच्या बस थांब्यावर त्या उभ्या करू नका म्हणून परिवहनतर्फे कर्मचारी नेमले आहेत. परंतु, त्यांच्याशी हुज्जत घालून त्या थेट बसथांब्यावर उभ्या राहत आहेत. कॅडबरी ब्रीज, नितीन कंपनी आणि तीनहातनाक्याजवळील ब्रीजच्या चढणीवर आणि उताराला रस्त्याच्या मधोमध त्या उभ्या केल्या जात आहे. अचानक त्या उभ्या राहत असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. हायवेला सर्वच वाहने सुसाट असतात, परंतु अशा पद्धतीने कुठेही कसेही प्रवासी घेणे आणि उतरविणे यामुळे इतर वाहन चालकांबरोबर प्रवाशांचा जीवदेखील धोक्यात घालण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत आहे.
दरम्यान, या बसेसवर कारवाई व्हावी म्हणून परिवहनच्या बैठकीत देखील चर्चा झाली होती. परंतु,आरटीओकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देऊन परिवहन प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचे अधिकारही त्यांनाच असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे आता या संदर्भात ठाणे वाहतूक पोलिसांशी चर्चा केली असता, त्यांनीदेखील या बसवर कारवाईचे अधिकार हे आरटीओला असल्याचे साांगितले आहे. आम्ही त्यांच्यासमवेत कारवाईला तयार आहोत, तसे पत्रव्यवहारदेखील आरटीओला केला आहे. परंतु,त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरटीओ आता कारवाईसाठी कोणाची वाट बघत आहे, हे पहाणे महत्त्वाचे ठरले आहे.