बेकायदा रिक्षा स्टॅण्डची आरटीओलाच माहिती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:44+5:302021-03-04T05:15:44+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात बेकायदा रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूककोंडी होत आहे. हे बेकायदा रिक्षा स्टॅण्ड नेमके किती आहेत, अशी ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात बेकायदा रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूककोंडी होत आहे. हे बेकायदा रिक्षा स्टॅण्ड नेमके किती आहेत, अशी माहिती आयुक्तांनी मंगळवारी झालेल्या वाहतुकीच्या बैठकीत विचारली असता आरटीओला ही माहिती सादर करता आली नाही. ही माहिती घेऊन बेकायदा रिक्षा स्टॅण्ड तातडीने हटविण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले आहे. एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने तर शहरात एक तरी अधिकृत रिक्षा स्टॅण्ड आहे की नाही तेच आम्हाला माहीत नाही, अशी धक्कादायक कबुली दिली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरात अधिकृत आणि बेकायदा रिक्षा स्टॅण्ड किती आहेत. याची विचारणा केली असता त्याची यादी आरटीओला सादर करता आली नाही. स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्ड आणि पार्किंगच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आयुक्त आरटीओ आणि वाहतूक पोलिसांसह येत्या शुक्रवारी पाहणी दौरा करणार आहेत.
या बैठकीनंतर सूर्यवंशी म्हणाले की, शहरातील रिक्षा प्रवाशांची मीटरनुसार रिक्षा चालविल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी असून त्याचा विचार केला जाईल. शेअर रिक्षामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. शेअर रिक्षा ठिकठिकाणी थांबत जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. यावर विचार केला जाईल. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अन्य तीन ठिकाणची सिग्नल यंत्रणा तयार आहे. ती वाहतूक पोलिसांनी ताब्यात घ्यावी, असे वाहतूक पोलिसांना सूचित केले आहे. तसेच अन्य १२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे.
...........
शहरात ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाशी संबंधित असलेले पोलीस हे कल्याणमध्ये येतात. त्यांच्या वाहनांना पार्किंगकरिता वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. जवळपास ८०० पोलिसांच्या वाहनांकरिता पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
........
शहरातील अनेक रस्त्यांवर अनावश्यक स्पीडब्रेकर आहेत. त्यांची उंची जास्त आहे. अनावश्यक असलेले स्पीडब्रेकर काढून टाकण्याची कार्यवाही केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
-----------------------
वाचली