कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींची नोंदणी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:43 AM2019-03-02T01:43:42+5:302019-03-02T01:43:47+5:30
मीरा रोड-भाईंदरमध्ये कारवाई : वेशांतर करून पोलिसांनी ताब्यात घेतल्या दुचाकी
मीरा रोड : कानठळ्या बसवणारे आवाज करत दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. पोलिसांना पाहून हे दुचाकीस्वार भन्नाट वेगाने पळत असल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलीस चक्क भिकारी, फकीर वा महाराज आदी विविध वेशभूषा करून दबा धरून बसतात आणि अशा दुचाकीस्वारांची धरपकड करत आहेत. अशा दुचाकींची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मीरा-भाईंदरमध्ये सध्या स्कूटीपासून बुलेटपर्यंत दुचाकींचे मूळ सायलेन्सर काढून कानठळ्या बसवणारा आवाज करत दुचाकी चालवण्यात येत आहेत. यात बहुतांश तरुणांचा सहभाग आहे. यामुळे ध्वनिप्रदूषण होते. अनेकवेळा अन्य दुचाकींच्या बाजूने अचानक आवाज करत जाणाºया या दुचाकींमुळे अन्य दुचाकीचालकांची भीतीने गाळण उडते. परिणामी, त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात घडण्याची शक्यता असते.
सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राम भालसिंग व पोलीस पथकाने नागरिकांना त्रास देणाºया दुचाकीस्वारांविरोधात मोहीम उघडली आहे.
सुरुवातीला अशा दुचाकीस्वारांना पकडण्यासाठी त्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता ते प्रचंड वेगाने पळून गेल्याने त्यांना अडवणे वा पाठलाग करणे म्हणजे पोलिसांनी अपघाताला निमंत्रण देण्याची भीती होती. तरीदेखील पोलिसांनी धाडसाने अनेकांवर कारवाई केली. आता पोलिसांनी सावरकर चौक येथील प्रमुख नाक्यावर वेशांतर करून कारवाई सुरू केली.
पोलीस कर्मचारी माने, भालेराव व वाकडे यांनी सिग्नलवर भिकारी, फकीर, साधू असे वेश पालटून दबा धरला. कानठळ्या बसवणारा आवाज करत दुचाकीस्वार आला की, त्याच्याजवळ जाऊन गाडीची चावी ते काढून घेऊ लागले. काही इमारतींमध्ये जाऊन पोलिसांनी तेथे उभ्या असलेल्या अशा दुचाकींवर कारवाई केली.
नागरिकांना त्रास देणाऱ्या अशा तीसपेक्षा जास्त दुचाकीस्वारांविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या इमारतीमधील अशा वाहनांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अशा दुचाकींची नोंदणी रद्द करण्यासाठी आरटीओला पत्र देणार आहोत.
- राम भालसिंग, पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे