रुक्मिणीबाई रुग्णालयात बाकावरच रुग्णांना ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:15+5:302021-04-15T04:39:15+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र बेड कमी त्याचा एक विदारक प्रत्यय बुधवारी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आला. रुग्णांना रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये असलेल्या बाकांवरच झोपवून ऑक्सिजन दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महापालिका हद्दीत एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. महापालिकेची सहा कोविड रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर आहेत. त्याशिवाय ६८ खासगी कोविड रुग्णालये सुरू असून रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिका आणि खासगी कोविड रुग्णालयात एकही बेड उपलब्ध होत नाही. त्यात महापालिकेने टेस्टिंगचे प्रमाण वाढवल्याने रुग्ण पॉझिव्हिटी रेट जास्त आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात दोन दिवसांपूर्वीच संशयित रुग्णांसाठी माणुसकीचा वाॅर्ड सुरू करण्यात आला. हा वाॅर्डही फुल झाला आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या संशयित रुग्णांची स्थिती गंभीर बनली आहे. त्यांना रुग्णालयाच्या पॅसेजमधील बाकावरच ऑक्सिजन लावल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धावपळ करणारे रुग्णांचे नातेवाइक हवालदिल झाले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता महापालिका बेडची क्षमता वाढविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन बाकावर झोपवून दिला जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. रुग्णांचा जीव वाचवणे हा महत्त्वाचा उद्देश त्यात आहे. त्यांची गैरसोय होत आहे. त्यावर लवकरच मात केली जाईल.
रुग्णालयांशी साधणार संवाद
बुधवारी सायंकाळी अत्यंत तातडीची बैठक आयुक्तांनी घेतली. त्यात महापालिकेचे अधिकारी, आरोग्य विषयतज्ज्ञ उपस्थित होते. उद्याही आयुक्त वेबिनारद्वारे खासगी कोविड रुग्णालयांशी संवाद साधणार आहेत. त्यात इंजेक्शनचा वापर, बेडची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा यासंदर्भात आढावा घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
फोटो पाठविला आहे.
----------------