‘रुक्मिणीबाई’चा लवकरच मेकओव्हर; स्थायी समितीचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:26 PM2019-11-22T23:26:57+5:302019-11-22T23:27:01+5:30
प्लास्टर, रंगकाम, प्रसाधनगृहांची होणार दुरुस्ती
कल्याण : पश्चिमेतील केडीएमसीचे प्रमुख रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचे रूपडे लवकरच पालटणार आहे. २० वर्षांपूर्वी बांधलेल्या या रुग्णालयाच्या बांधकामाची दुरुस्ती केली जाणार आहे. यासंदर्भातील एक कोटी ३९ लाख ४७ हजार १५१ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. इमारतीच्या बांधकाम दुरुस्तीबरोबरच रंगकाम, प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीसह अन्य कामे मार्गी लावली जाणार आहेत.
रुक्मिणीबाई रुग्णालयात कल्याण शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण तसेच तालुक्याच्या ठिकाणाहून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. ही इमारत २० वर्षांपूर्वी बांधल्याने येथील बांधकामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्याच्या अहवालानुसार बांधकामाच्या व इतर दुरुस्त्या सूचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार, या कामासाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत तीन जणांच्या निविदा उघडण्यात आल्या. त्यात मे. गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा प्राकलन दराने आल्याने तिला अंतिम मंजुरी मिळण्याकामीचा प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी पटलावर दाखल करण्यात आला होता. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मान्यता दिली.
स्थायी समितीने दुरुस्तीच्या कामाला हिरवा कंदील दाखविल्याने लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. कार्यादेश मिळताच हे काम सुरू होईल. साधारण १५ दिवसांत कामाला प्रारंभ होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट यांनी ‘लोकमत’ला दिली.
विशेष म्हणजे या दुरुस्ती कामाच्या कालावधीत रुग्णालय सुरूच राहील. यातील कोणताही विभाग बंद राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांधकाम दुरुस्तीबरोबरच पूर्ण रंगकाम, प्रसाधनगृहांची दुरुस्ती, छतावर शेड बांधणे, दरवाजे, खिडक्या आणि प्रसाधनगृहांची दुरुस्ती, गेट बसविणे, फर्निचर दुरुस्ती आदी कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
फुले कलामंदिरात होणार अंतर्गत दुरुस्ती
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील वातानुकूलित यंत्रणेचे काम मार्गी लागल्यावर आता नाट्यगृहातील अंतर्गत दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे.
नाट्यगृहाचे बांधकाम १२ वर्षांपूर्वी उभे राहिले आहे. येथील वातानुकूलित यंत्रणेचे काम नुकतेच पूर्ण झाले. यासाठी एक वर्ष नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. मात्र, त्यावेळी नाट्यगृहातील अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली नव्हती. खराब झालेले प्रसाधनगृह, ड्रेनेज पाइप फुटलेले असल्याने गळतीचे चित्र कायम होते.
यासंदर्भात दुरुस्तीचा प्रस्तावही स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यालाही सभापती दीपेश म्हात्रे आणि सदस्यांनी मंजुरी दिली. या कामांतर्गत प्लंबिंग, टॉयलेट, मुख्य सभागृहातील दरवाजे व त्यांचे डोअर क्लोजर दुरुस्ती किंवा नवीन बसविणे, पडदे बसविणे, मेकअप रूम दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या नवीन बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
मे. राजेश कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम करणार आहे. या कामासाठी ५२ लाख ४७ हजार ९०८ रुपये इतका खर्च येणार आहे. दरम्यान, हे दुरुस्तीचे काम सुरू असताना नाट्यगृह बंद राहणार नाही, अशी माहिती शहरअभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली.