‘रुक्मिणीबाई’मधील कोरोना चाचणी केंद्रावर नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:40 AM2021-04-08T04:40:56+5:302021-04-08T04:40:56+5:30
कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत असल्याने काही नागरिक स्वत:हून कोरोनाची चाचणी करून घेत आहेत. मात्र, मनपाच्या ...
कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत असल्याने काही नागरिक स्वत:हून कोरोनाची चाचणी करून घेत आहेत. मात्र, मनपाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कोरोना चाचणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. कोरोना काळातील नियम चाचणी केंद्रांवर धाब्यावर बसवले जात असतील तर चाचणीसाठी आलेल्यांकडून ही कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य जणांना होऊ शकतो. त्यामुळे चाचणीसाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
रुक्मिणीबाई रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणीची सुविधा असून, तेथे बुधवारी चाचणीसाठी काहींनी रांग लावली होती. मात्र, सोशल डिस्टन्सिंग पाळलेले नव्हते. त्यामुळे चाचणीसाठी आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोरोना नसलेल्यांना रुग्णांकडून बाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. चाचणी केंद्राच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग मोडणाऱ्यांना कोणताच जाब विचारला नाही. कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी मनपाने विविध प्रकारचे निर्बंध घातले आहेत. मात्र, चाचणी केंद्रांवर या नियमांचे उल्लंघन केले जात असताना त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याकडे चाचणीच्या रांगेतील नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
---------------------