सत्तेच्या गैरवापराच्या मर्यादा सत्ताधाऱ्यांनी सोडल्या- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 09:49 PM2023-03-10T21:49:51+5:302023-03-10T21:50:03+5:30
अगदी पोलिसांसह सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे. योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता याचा निकाल देईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात दिला.
ठाणे : सत्तेचा गैरवापर किती करायचा, याच्या मर्यादा सरकारने सोडल्या आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. अगदी पोलिसांसह सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे. योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता याचा निकाल देईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात दिला.
ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पाटील शुक्रवारी रात्री कळव्यात आले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ठाण्यात विरोधकांवर अनेक गुन्हे दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली ही भूमिका व्यक्त केली.
ठामपाचे सहायक आयुक्त महेश आहेर प्रकरणावर ते म्हणाले की, सरकार कसे चालले आहे, हे यावरून कळते. ते किती पक्षपाती आहे हेही यावरून कळते, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. नगर जिल्हा बँकेत महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे सत्तांतर झाले, या प्रश्नावर मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हेही त्यांच्यासमवेत होते.