टोइंग ऑपरेटर्सच्या कामात शिस्त आणण्यासाठी वाहतूक शाखेचा नियमांचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:28 PM2020-12-16T17:28:03+5:302020-12-16T17:28:38+5:30

वाहनचालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी कार्यवाही

The rules of the transport branch to bring discipline in the work of towing operators | टोइंग ऑपरेटर्सच्या कामात शिस्त आणण्यासाठी वाहतूक शाखेचा नियमांचा बडगा

टोइंग ऑपरेटर्सच्या कामात शिस्त आणण्यासाठी वाहतूक शाखेचा नियमांचा बडगा

Next

ठाणे: रस्त्याच्या कडेला, नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने, विशेषत: दुचाकी विरोधात केली जाणाऱ्या ‘टोइंग’च्या कारवाईत शिस्त आणण्याचा निर्णय ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने घेतला आहे. या टोइंगच्या कारवाईसाठी टोइंग कंत्राटदारासमवेतच्या करारात असलेल्या सर्व अटींचे काटेकोर पालन करण्याची ठाम भूमिका वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी घेतली आहे.

त्यामुळे आता वाहन उचलून नेण्यापूर्वी टोइंगच्या गाडीतून उद्घोषणा केली जाणार आहे; तसेच उचललेल्या वाहनाच्या जागी वाहतूक शाखेचा स्टीकर लावण्यात येणार असून या स्टीकरवर संबंधित वाहतूक चौकीचे नाव व दूरध्वनी क्रमांक असणार आहे, जेणेकरून वाहनधारकाला आपले वाहन नेमके कुठल्या वाहतूक चौकीवर नेण्यात आले आहे, याबाबत संभ्रम राहाणार नाही. तसेच, या संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रिकरणही करण्यात येणार आहे. १ जानेवारी पासून याची अमलबजावणी केली जाणार आहे.

वाहनधारक आणि टोइंग ऑपरेटर यांच्यात अनेकदा वाद झालेले दिसून येतात. अनेकदा गाड्यांचे नुकसान झाल्याची तक्रारही केली जाते. वाहनचालक जागेवर उपस्थित असला तरी वाहन उचलून नेले जाते, वाहन नेल्यानंतर खडूने त्याजागी सांकेतिक भाषेत लिहिले जाते, ती भाषा वाहनचालकाच्या परिचयाची नसल्यामुळे आपले वाहन नेमके कुठे नेले आहे, याचा थांगपत्ता वाहनचालकाला लागत नाही, तसेच अनेकदा हे खडूचे मार्किंग पुसले गेल्यामुळे वाहन चोरीला गेले की, वाहतूक पोलिसांनी उचलून नेले, याबाबतही संभ्रम निर्माण होऊन वाहनचालक सैरभैर होतात.

हे सर्व टाळण्यासाठी वरीलप्रमाणे उपाययोजना करण्याचा निर्णय ठाण्याचे पोलिस आयुक्त मा. विवेक फणसाळकर यांच्या आदेशाने घेतला असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. टोइंग कंत्राटदारांच्या करारात नमूद केले असल्याप्रमाणे वाहन उचलण्यापूर्वी जाहीर उद्घोषणा करून संबंधित वाहनचालकाला आपले वाहन उचलण्यासाठी काही अवधी दिला जाईल. त्या अवधीत वाहनचालकाने येऊन वाहन हलवल्यास त्याच्याकडून केवळ नो पार्किंगच्या दंडाची रक्कम घेतली जाईल, टोइंग चार्जेस घेतले जाणार नाहीत.

वाहनचालक त्या अवधीत न आल्यास वाहन उचलून चौकीवर आणले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आपले वाहन नेमके कुठल्या चौकीवर नेले आहे, याची माहिती देणारे स्टीकर त्या जागेवर ठळकपणे लावले जाणार असून या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरणही केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वाहनचालकांना होणारा मनस्ताप यामुळे टळणार असून वादाचे प्रसंगही फारसे उद्भवणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: The rules of the transport branch to bring discipline in the work of towing operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.