सत्ताधारी-विरोधकांचे मनोमीलन? युतीच्या घोषणेमुळे काँग्रेस एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:13 AM2019-02-20T04:13:50+5:302019-02-20T04:13:54+5:30

मीरा-भार्इंदर महापालिका : भाजपा-सेना युतीमुळे सत्तेचा समतोल बिघडला, काँग्रेस एकाकी

The ruling-opponent's mind? The Congress is lonely due to the declaration of the alliance | सत्ताधारी-विरोधकांचे मनोमीलन? युतीच्या घोषणेमुळे काँग्रेस एकाकी

सत्ताधारी-विरोधकांचे मनोमीलन? युतीच्या घोषणेमुळे काँग्रेस एकाकी

Next

राजू काळे।

भार्इंदर : येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा व शिवसेना या मित्रपक्षांनी एकत्रित लढवण्याची घोषणा केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेत जेथे भाजपा हा सत्ताधारी तर शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष आहे तेथील स्थानिक राजकारणात या दिलजमाईचे परिणाम लवकरच दिसून येण्याची चिन्हे आहेत. अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरुन एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आता हातात हात गुंफून प्रचार करायला लागणार असल्याने या दोन शहरांत काँग्रेसला एकाकी झुंज द्यावी लागणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.

केंद्रासह राज्य सरकारात भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने गेल्या काही दिवसांत अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन परस्परांवर हल्ले सुरु केल्यानंतर मीरा-भाईंदर या महापालिकेत जेथे हे दोन्ही पक्ष सत्ताधारी व विरोधक आहेत तेथे उभयतांमधील संघर्ष अधिकच प्रखर झाला होता. अचानक परस्परविरोध व आक्रमक भाषा गुंडाळून भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केल्याने मीरा-भाईंदरमधील राजकारणाचा समतोलच बिघडला आहे. २०१७ मधील मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत व तद्नंतर सतत एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या भाजपा व शिवसेनेत समझोता होणार असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात केले होते. दोन्ही पक्षांची युती झाल्याने यापुढे भाजपाचे आ. नरेंद्र मेहता व शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांनी आपापसातील वादविवाद विसरुन काम करावे लागणार आहे.
पालिका निवडणुकीत भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरल्याने पालिकेची सत्ता भाजपाच्या हाती आली तर शिवसेना विरोधी पक्ष झाली. भाजपाने हक्काच्या पदांसाठी तसेच आवश्यक दालनासाठी शिवसेनेला झुलत ठेवले. शिवसेनेची गळचेपी केल्याने स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये खुन्नस निर्माण झाली आहे. भाजपाने काही विकासकामे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात करण्याचा प्रयत्न केला.
अर्थातच त्याला शिवसेनेने जोरदार विरोध करुन ती कामे रखडवली. जलकुंभ लोकार्पणावरुन उभय पक्षांमध्ये झालेला राडा असो की शिक्षणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बाजार थाटण्याचा प्रकार. शिवसेनेनी भाजपाला रोकठोक उत्तर दिले. आता युतीनंतर भाजपाच्या त्याच विकास कामांवर मते मागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.
काँग्रेस मात्र एकाकी पडली आहे. सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या एकत्रित ताकदीशी काँग्रेसला दोन हात करावे लागणार आहेत.

भाजपाने शहराच्या हितासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना नक्कीच पाठिंबा देईल. शहराच्या हितासाठी नसलेल्या पण स्वार्थासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना सभागृहात तसेच सभागृहाबाहेर कायम विरोधच करील.
- प्रताप सरनाईक,
आमदार, शिवसेना

युतीमुळे भाजपाच्या सबका साथ, सबका विकास धोरणाला शिवसेना सहकार्य करुन स्थानिक पातळीवर युती धर्म पाळेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने भाजपाला सहकार्य केल्यास शहराचा विकास सहज होईल.
- चंद्रकांत वैती, उपमहापौर,
मीरा-भाईंदर

युती धर्म पाळण्यासाठी विरोधी पक्षातील शिवसेनेने भाजपाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस विरोधकांची भूमिका वठवेल. शहराच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध असल्याने काँग्रेस कधीच एकाकी पडली नाही व पडणारही नाही. यंदाची युती ही केवळ आगामी निवडणुकांतील अ‍ॅडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुन्हा दोघांत धुसफूस सुरूच राहणार आहे.
- जुबेर इनामदार, काँग्रेस गटनेता

Web Title: The ruling-opponent's mind? The Congress is lonely due to the declaration of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.